पान एक
----------------
महापालिकेत सुट्ट्यांचा फिवर कायम
कामाच्या दिवशी सतराशे कर्मचारी गैरहजर, पालिकेच्या कामकाजावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : दिवाळीच्या पाच दिवसांच्या सुट्ट्यानंतर नियमित कामकाज सुरु होणे अपेक्षित असताना गुरुवारी (ता. १२) तब्बल १६९६ कर्मचायांनी सुट्टी घेतल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर दिसून आला. पालिका मुख्यालयासह विभागिय कार्यालयांमध्ये कामकाजाच्या दिवशी देखील सुट्ट्यांचे वातावरण होते. आता शुक्रवारचा एक दिवस सोडल्यानंतर पुन्हा दोन दिवसांच्या शासकीय सुट्ट्या असल्याने सोमवारपासून (ता.१६) नियमित कामकाज सुरु होण्याची अपेक्षा आहे.
दिवाळीनिमित्त शासनाने सहा नोव्हेंबरची धनत्रयोदशीची सुट्टी सोमवारी (ता.९) जाहीर केली होती. त्यामुळे शुक्रवार ते बुधवार असा पाच दिवसांची सुट्टी होती. दिवाळी नंतर अनेक कर्मचाऱ्यांनी रजेसाठी अर्ज दिले तर अनेक कर्मचाऱ्यांनी गुरुवारी हजेरी लावून दांडी मारली. गुरुवार व शुक्रवार असे कामकाजाचे दोन दिवस वगळता पुन्हा दोन दिवसांची शासकीय सुट्टी असल्याने तब्बल नऊ दिवसांच्या सुट्टीचा आनंद कर्मचारी घेत आहे. महापालिकेत एकुण चार हजार ४९ कर्मचारी आहेत. त्यातील १ हजार ६९६ कर्मचारी कामावर हजर नव्हते. सलग सुट्ट्यांमुळे अनेकजण पर्यटनासाठी गेल्याचे सांगितले जात आहे.
कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने पालिकेच्या कामकाजावर परिणाम दिसून येत आहे. स्वच्छता कर्मचारी नियमित असल्याचे सांगितले जात असले तरी शहरातील रस्त्यांवर फटाक्यांचा कचरा अद्यापही पडून असल्याने पालिकेचा दावा फोल ठरला आहे. दरम्यान अघोषित सुट्ट्यांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
----------------
दांडी मारणाऱ्यांवर कारवाई
अघोषित सुट्टीची प्रशासनाने अखेर गंभीर दखल घेतली आहे. विनापरवाना गैरहजर राहणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणार असल्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितले. सर्व विभागप्रमुखांकडून गैरहजरांचा अहवाल मागविला आहे. मंजूर रजेवर कोण आणि बिनपरवानगी दांडी मारणारे कोण, याची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारचा एक दिवस काम करून पुन्हा दोन दिवस सुट्टी, त्यामुळे सोमवारपासून तरी पालिका पूर्ण क्षमतेने सुरू होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------------