महापालिकेने करमाफीचा ठराव करावा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : महापालिका प्रशासन नागरिकांना विविध सुविधा देत नसेल तर महापालिकेत करमाफीचा ठराव पारित करा व येणाऱ्या नागपूर अधिवेशनात ठराव मंजूर करुन आणून शहरवासियांना करमाफी मिळवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.
सत्ताधारी आरोग्य, साफसफाई, दिवाबत्ती, रस्ते, गटारी, पाणीपुरवठा आदी आवश्यक सुविधा देण्यास महापालिकेत अपयशी ठरत आहेत, पण त्याचे खापर महापालिका प्रशासनावर फोडून शहराचे आमदार मोकळे होत आहेत. एकीकडे आमदार भोळे महापालिका प्रशासनाच्या बैठकीत ‘सुविधा देऊ शकत नसाल तर नागरिकांकडून करवसुली बंद करा’ असे सांगत आहेत. परंतु महापालिका सुविधा देऊ शकत असो वा नसो नागरिकांना कर भरावाच लागतो, हे आमदारांनी आधी लक्षात घ्यावे.
शहरातील व्यापारी गाळेधारकांचा गेल्या १५ वर्षांपासूनचा तीन टक्के दर कमी होऊ शकत नाही. आमदार भोळे यांना नागरिकांसाठी तळमळ असेल तर महापालिकेत ९५ टक्के नगरसेवक तुमचे आहे, सत्ता तुमची आहे तर तसा ठराव महापालिकेत पूर्ण बहुमताने ठराव मंजूर करावा, अशी मागणी राष्ट्र्रावादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिग सूर्यवंशी, राजू मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, जिल्हा उपाघ्यक्ष किरण राजपूत आदींनी केली आहे.