लेख १० वा
फोटो -NSK26H33745 संजय अमृतकर
फोटो - NSK26H33746 गड-किल्ले
नाशिक : गड-किल्ल्यांच्या सावलीतला निसर्गवारसा
------------------------------------------
इतिहासाच्या पाऊलखुणा, सह्याद्रीच्या वाटा आणि पाण्याने समृद्ध झालेला भूगोल
नाशिक म्हटले की, डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो तो गोदावरीचा शांत प्रवाह... त्र्यंबकेश्वरच्या कुशीतून उगम पावलेली नदी, तिच्या काठावर वसलेले प्राचीन शहर आणि दूरवर आकाशाला भिडणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा. पण नाशिकला खऱ्या अर्थाने ओळखायचं असेल, तर शहराच्या चौकटीबाहेर पडावे लागते. नाशिक हा केवळ तीर्थक्षेत्रांचा जिल्हा नाही. तो गड-किल्ल्यांचा, डोंगरांचा, जलाशयांचा, धबधब्यांचा आणि समृद्ध निसर्गाचा जिवंत वारसा आहे.
- संजय अमृतकर
नाशिक जिल्ह्याच्या डोंगररांगांमध्ये अनेक गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक किल्ल्याचा चेहरा वेगळा आणि प्रत्येकाची कहाणी वेगळी. साल्हेर आणि मुल्हेरकडे पाहिले की सह्याद्रीची उंची जाणवते. साल्हेरच्या माथ्यावर उभे राहिल्यावर चौफेर पसरलेला अफाट प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. या उंचीला इतिहासाची जोड मिळते आणि किल्ला केवळ दगडांचा ढिगारा राहत नाही; तो आपल्या पूर्वजांच्या धैर्याची साक्ष बनतो. रामशेजचा डोंगर दिसतो, तेव्हा शिवकालीन संघर्ष आठवतो. अनेक वर्षं चाललेल्या मुघल-मराठा झुंजीची स्मृती या कातळांनी आपल्या अंगाखांद्यावर जपली आहे. किल्ल्याच्या भग्न भिंतींना हात लावला की इतिहास पुस्तकातून बाहेर येतो आणि बोटांच्या टोकांवर येऊन थांबतो.
अंजनेरीचा डोंगर इतिहासाबरोबरच श्रद्धेचीही वाट दाखवतो. डोंगर, मंदिरे, प्राचीन अवशेष, दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पती, गिधाडांचे अस्तित्व आणि पायवाटांवरची शांतता... या सगळ्यातून काळाची अनेक रूपे दिसतात. ब्रह्मगिरी तर नाशिकच्या अस्तित्वाशीच जोडलेला. गोदावरीचा उगम, त्र्यंबकेश्वरची धार्मिक परंपरा आणि सह्याद्रीचा निसर्ग, या तिघांचा अद्भुत संगम येथे घडतो. धोडपचा अजस्र कातळ दुरूनच आपले लक्ष वेधून घेतो. सातमाळा रांगेतील हा गड पाहताना वाटते, निसर्गानेच एखादे भव्य शिल्प कोरून त्यावर इतिहास लिहिला असावा. हातगड ते अंकाई-टंकाई किल्ले, मोरधन ते साल्हेर परिसरातील डोंगरवाटा आणि असे अनेक लहान-मोठे गड नाशिकच्या भटकंतीला सतत नवे क्षितिज देत राहतात.
पाण्याने समृद्ध केलेली भूमी
पण नाशिकचा वारसा फक्त किल्ल्यांच्या दगडांत नाही. तो पाण्यातही आहे. गंगापूर, चणकापूर, दारणा, ओझरखेड, भाम, भावली ते अर्जुनसागर आणि परिसरातील इतर धरणांचे विस्तीर्ण जलाशय पाहताना नाशिकच्या भूगोलाचा दुसरा चेहरा दिसतो. डोंगरांच्या कुशीत साठलेले पाणी, त्यावर पडलेले आभाळाचे प्रतिबिंब, सभोवतालची शेती आणि पाण्यावर विसावलेले पक्षी... हे दृश्य केवळ सुंदर नाही; ते नाशिकच्या जीवनव्यवस्थेची कहाणी सांगते.
जेव्हा डोंगरांना शब्द फुटतात...
पावसाळा आला की, नाशिकच्या डोंगरांना जणू शब्द फुटतात. दुगारवाडीचा धबधबा कड्यावरून कोसळू लागला की सगळा परिसर पाण्याच्या नादाने भरून जातो. कालपर्यंत शांत असलेली दरी अचानक जिवंत होते. धुके, हिरवाई, कातळावरून धावणारे पाणी आणि त्यातून जाणारी एखादी पायवाट... त्या क्षणी निसर्ग आपल्याला पर्यटक मानत नाही; तो आपल्याला आपल्या जगाचा एक भाग करून घेतो. पेठ तालुक्यातील भिवतास धबधबा तर काय वर्णावा? पावसाळ्यातले त्याचे रौद्ररूप काळजाचा ठोका चुकवणारे आहे. बिलकस धबधबा जगप्रसिद्ध नायगराची आठवण करून देतो. त्र्यंबकेश्वर परिसरातील उंब्रार्डेचा नॅनो धबधबा आणि गगनभेदी शितकडा म्हणजे निसर्गाचे अद्भुत कलाविष्कारच. घोटीचा रूपेश धबधबा आणि भावली धरण परिसरातील अगणित धबधबे म्हणजे पावसाळ्यातले एक अनोखे विश्वच. सोमेश्वरचा परिसरही गोदावरीच्या प्रवाहामुळे वेगळे सौंदर्य धारण करतो. नदी, मंदिर आणि हिरवाई यांचे हे नाते नाशिकच्या सांस्कृतिक स्मृतीचा एक भाग आहे.
आणि मग येते... नांदूरमध्यमेश्वर!
पाणी साठले की, फक्त शेती जगत नाही, पक्ष्यांचेही एक जग उभे राहते. विविध स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे नांदूरमध्यमेश्वरला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पक्षी-अभयारण्यांमध्ये स्थान मिळालं आहे. किल्ल्यांच्या कातळांपासून पक्ष्यांच्या पंखांपर्यंत, नाशिकचा निसर्ग किती विविधरंगी आहे, याची जाणीव येथे होते.
वाटा आणि वारशाची नजर
या सगळ्या ठिकाणी जाण्याच्या वाटाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. काही वाटा वाहनाने संपतात आणि पुढची वाट पायांनी चालावी लागते. काही ठिकाणी गावकऱ्यांना विचारत पायवाट शोधावी लागते. कुठे चढण अंगाची परीक्षा घेते, तर कुठे एखाद्या वळणावर अचानक उलगडलेले दृश्य सारा थकवा विसरायला लावते. म्हणूनच या ठिकाणी जाताना केवळ पर्यटकाची नजर घेऊन जाऊ नका; निसर्ग, पर्यावरण आणि इतिहासाच्या प्रेमासोबत वारशाची नजरही घेऊन जा.
किल्ल्यावरचा प्रत्येक दगड जपावा. जंगलात प्लास्टिक सोडू नये. धबधब्याच्या पाण्यात बेफिकीरपणे उतरण्यापेक्षा त्याचा नाद ऐकावा. स्थानिक माणसांचा सन्मान करावा. कारण निसर्ग आणि वारसा हे फक्त पाहण्यासाठी नसतात; ते जपण्यासाठी असतात.
इतिहास इथे अजून संपलेला नाही
नाशिकच्या या वाटांवर गेलं की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते…
इतिहास इथे अजून संपलेला नाही.
तो मार्कंडेयच्या माथ्यावरच्या वाऱ्यात आहे.
गाळण्याच्या कातळात आहे.
कांचनच्या पायवाटेवर आहे.
कळसूबाईच्या पावसात आहे.
चौल्हेरच्या सावलीत आहे.
दावलेश्वरच्या प्रवाहाच्या नादात आहे.
आणि नांदूरमध्यमेश्वरच्या आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांत आहे.
नाशिकला पाहणं म्हणजे केवळ एक शहर पाहणं नव्हे.
ही भूमी वाचणं आहे.
तिचा इतिहास ऐकणं आहे.
तिच्या निसर्गाशी संवाद साधणं आहे.
आणि शेवटी जाणवतं…
या सगळ्याचे आपण केवळ प्रवासी नाही.
आपण या वारशाचे पुढचे रखवालदार आहोत.