फोटो-23269
वडांगळी ः न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ट्रॅफिक नियमांच्या प्रात्यक्षिकांची पाहणी करताना पोलिस व शिक्षक.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये
वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २६ ः झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाइन व सिग्नल, नो पार्किंग, प्रवेशबंदी, एकतर्फी मार्ग या वाहतुकीच्या खुणा रस्त्यावर दिसत असल्या तरी त्या प्रत्यक्षात शाळेतही दिसू लागल्या आहेत. शाळेतच ट्रॅफिक स्कूलची उभारणी करून वडांगळी येथील न्यू इंग्लिशमधील विद्यार्थ्यांनी अभिनव उपक्रम राबविला.
नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रॅफिक हवालदार सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य खैरनार, बाळासाहेब अडसरे यांनी सहकार्य केले. शाळेच्या व्हरांड्यातच झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाइन, विविध प्रकारच्या सिग्नलच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या. लाल, पिवळा व हिरवा असे तीन रंगांचे सिग्नल, त्यांचा वापर, अर्थ याची माहिती, सिग्नलवर थांबणे, सावध राहणे, पुढे जाणे याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे, स्टॉप लाइनचे पालन करणे आदी नियमांचा विद्यार्थ्यांनी सराव केला. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचा कृतीतून अनुभव मिळाला. शालेय स्तरावरच वाहतूक शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. ‘नियम पाळा, सुरक्षित राहा’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, भाऊसाहेब चव्हाणके, विक्रम खुळे, दिनकर खुळे. पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक यांनी कौतुक केले.
................