
Nashik News : महामार्ग रुंदीकरणात हरवला पोहेगावचा रस्ता
सिन्नर : शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे पाथरे (ता.सिन्नर) येथून पोहेगावकडे जाणारा पूर्वापार रस्ता वाहतुकीसाठी कायमचा बंद झाला आहे. सिन्नर बाजूकडून पोहेगावकडे जाण्यासाठी रस्ताच न राहिल्याने नियमित वाहनधारक व स्थानिकांना थेट देर्डे गावाला वळसा मारुन पोहेगावला जाण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासंदर्भात सर्वेक्षण करून तातडीने पाथरे गावाजवळ पोहेगावकडे जाणाऱ्या फाट्यावर जंक्शन उभारावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहे.
सिन्नर-शिर्डी महामार्गाचे काम सध्या झपाट्याने सुरू आहे. परंतु महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या नादात प्राधिकरणाकडून स्थानिक गावांना जोडणारे रस्ते, उपरस्ते यांचा विचार करण्यात न आल्याने स्थानिकांना आतापासूनच अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चार पदरी असणारा शिर्डी महामार्ग दुभाजकांमुळे विभागला गेला असून त्यामुळे रस्ता ओलांडणे वाहनांना शक्य होणार नाही. यातच पाथरे गावाजवळ असलेला पोहेगाव रस्ता देखील महामार्ग विभागाच्या दुर्लक्षाचा बळी ठरला आहे.
शिर्डी महामार्गाचे रुंदीकरण होत असताना सुरक्षेच्या कारणास्तव पोहेगावकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जागाच सोडण्यात आली नसल्याने पाथरे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील हजारो रहिवासी यांना पोहेगाव रस्त्यावरील शिवारात शेतांमध्ये वस्ती करून राहतात. या रहिवाशांना पाथरे गावात नियमित येण्यासाठी व पुन्हा जाण्यासाठी पोहेगाव फाट्यावर सुविधाच दिलेली नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी अडचण झाली आहे. याशिवाय पोहेगावकडे नेहमीच जाणाऱ्या वाहनांना शिर्डी महामार्गावरून देर्डे गावापर्यंत जाऊन तेथून पोहेगावकडे जावे लागत आहे.
हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
पाथरे गाव नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवरील अखेरचे गाव असून आर्थिक व्यवहारांसाठी व दैनंदिन कामांसाठी येथील रहिवासी सतत पोहेगावच्या संपर्कात असतात. मात्र या संपर्काचा दुवा असलेला जवळचा मार्ग बंद होणार असल्याने महामार्ग विभागाच्या विरोधात स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाथरे येथे समक्ष येऊन पोहेगाव कडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करावी या रस्त्याचा वापर करणाऱ्या शेतकरी, रहिवाशांची सोय व्हावी यासाठी तातडीने पोहेगाव फाट्यावर जंक्शन निर्माण करावे अशी पाथरे परिसरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी, सामाजिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
''पाथरे हून पोहेगाव कडे जाणारा पूर्वापार रस्ता शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणामुळे बंद करण्यात आला आहे. महामार्गाचे काम सुरू होण्याआधी तांत्रिक सर्वेक्षणात पोहेगाव रस्त्याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे आज रस्ता बंद झाल्यावर स्थानिकांना पंधरा ते वीस किलोमीटरचा वळसा घालून पोहेगावला जावे लागत आहे. तर पोहेगाव रस्त्यालगत वस्ती करून राहणाऱ्या पाथरे शिवारातील रहिवाशांना देखील मोठी अडचण सहन करावी लागत आहे.'' - मच्छिंद्र चिने, माजी सरपंच (पाथरे)
''पाथरे गावात बस स्थानकासमोर महामार्गाला कट देण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी रस्ता ओलांडणे इतर वाहनांच्या वेगामुळे कसरतीचे होईल. या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्याची गरज आहे. याशिवाय पादचाऱ्यांसाठी असलेला स्कायवॉक देखील अनाठायी खर्च करून बांधण्यात आला आहे. भविष्यात त्याचा वापर कोणीच करणार नाही. स्कायवॉक ऐवजी भुयारी मार्ग योग्य राहिला असता. जनावरे रस्त्याच्या पलीकडे नेण्यासाठी देखील प्रभावी सुविधा आवश्यक आहे. अन्यथा येथे सतत अपघात होणार.'' - मनोज गवळी, सामाजिक कार्यकर्ता
''शिर्डी महामार्गाचा प्रकल्प आराखडा बनवताना त्रयस्थ यंत्रणेमार्फत सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. या यंत्रणेने सुचविल्या नुसार आवश्यक त्या ठिकाणीच महामार्गावर येण्यासाठी व उतरण्यासाठी जागा सोडण्यात आली आहे. स्थानिकांच्या मागणीचा विचार करून सेफ्टी ऑडिट विभागाकडून पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतरच रस्ते सोडण्याबाबत निर्णय जाईल.'' - दिलीप पाटील, उपअभियंता (न्हाई)