३०-२
निफाड येथे पारा ११ तर,
नाशिकला १२.६ अंशावर
----
थंडीचा जोर वाढतोय ः हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१५ ः पाऱ्यातील घसरण सुरु असल्याने रोजच हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. सातत्याने पारा घसरत असताना, नागरिकांना थंडी जाणवू लागली आहे. रविवारी (ता.१५) निफाडचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस तर नाशिकचे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या दैनंदिन अहवालानुसार, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये पुण्याचे किमान तापमान (१२.१ अंश सेल्सिअस राज्यात नीचांकी किमान तापमान म्हणून नोंदविले गेले आहे. त्याखालोखाल नाशिकचे किमान तापमान निच्चांकी आहे. हवामान कोरडे राहाण्याची शक्यता असल्याने, पुढील काही दिवसांत पारा आणखी घसरत जाण्याची शक्यता आहे.
आठवड्याभरात जेमतेम दोन अंश सेल्सिअस तापमान घसरले असले तरी, कमाल तापमानात मात्र मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा चटका वाढत असून सायंकाळनंतर गार वाऱ्यामुळे तापमानात मोठी घसरण होत असल्याने थंडीची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवते आहे. रविवारी नाशिकचे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस नोंदविले असले तरी, कमाल तापमान मात्र ३१.६ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. दोन्ही तापमानात मोठी तफावत सध्या दिसते आहे. संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे.