esakal | नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : आणखी 7 जण निलंबित; ‘सिक्युरिटी व्यवस्थे’ची पोलखोल
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : आणखी 7 जण निलंबित

नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : आणखी 7 जण निलंबित

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : देशाच्या सामरिक सुरक्षेइतक्याच आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या चलार्थपत्र मुद्रणालयातील पाच लाखांच्या नोटा चोरीप्रकरणी बुधवारी (ता. २८) आणखी सात जणांना निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे, मुद्रणालयाच्या फाइंड ॲन्ड फॅक्ट कमिटीच्या अहवालानुसार ज्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, त्यांच्याऐवजी अन्य विभागातील अधिकारीच या प्रकरणात अडकले आहेत. परिणामी, पोलिस चौकशीमुळे सिक्युरिटी प्रेसच्या सुरक्षाव्यवस्थेचीच पोलखोल झाली आहे. (Nashik-note-press-theft-Seven-more suspended-marathi-news-jpd93)

आतापर्यंत नऊ जण निलंबित

निलंबित अधिकाऱ्यांमध्ये चलार्थपत्र मुद्रणालयाचे उपप्रबंधक, सहाय्यक प्रबंधक, निरीक्षकांसह तीन कामगारांचाही समावेश आहे. मंगळवारी दोन सुपरवायझरवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर बुधवारी आणखी दोन निरीक्षकांसह तीन कामगार निलंबित झाले. मात्र, मुख्य महाव्यवस्थापक बाहेरगावी असल्याने निलंबन ऑर्डर सायंकाळी उशिरापर्यंत दिलेल्या नसल्याचे समजते. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जण निलंबित झाले आहेत.

प्रेसमधील नोटा चोरीप्रकरणात मुख्य व्यवस्थापकाची उचलबांगडी

प्रेस मधील नोटा चोरीप्रकरणी मुख्य व्यवस्थापक एस. एल. वर्मा यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांनी गुन्हा दाखल करण्यास सहा महिन्यांचा कालावधी लावल्याने ही बदली करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या जागी हैदराबाद येथील बोलेवार बाबू यांची नियुक्ती करण्यात आली असून वर्मा यांची रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट विभागाचे महाव्यवस्थापक पदी बदली झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फाइंड ॲन्ड फॅक्ट बाजूलाच

या प्रकरणाच्या निमित्ताने मुद्रणालयातील प्रमाणित कामकाज पद्धतीची पोलखोल झाल्याने हा विषय देशाच्या आर्थिक सुरक्षेच्या अंगाने गंभीर वळणावर आला आहे. प्रेसमधील फाइंड ॲन्ड फॅक्ट समिती, नाशिक शहर पोलिस आणि प्रेस महामंडळाची विशेष समिती अशा तीन स्तरांवर हा तपास सुरू आहे. यात शहर पोलिस आणि दिल्ली येथील समिती यांच्या तपासाची दिशा ‘कट नोट-२’ विभागाभोवती केंद्रित आहे, तर फाइंड ॲन्ड फॅक्ट समितीने मात्र डिस्पॅच विभाग केंद्रबिंदू मानून तेथील कर्मचाऱ्यांची नावे दिल्याने या समितीचा तपास अडचणीत सापडला आहे. त्यामुळे मुद्रणालयातील उच्चपदस्थ सत्य लपवत आहे की काय, असा नवाच प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. या समितीने सहा महिने अंतर्गत तपासणीत डिस्पॅच विभागातील १२ ते १३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, तर पोलिसांनी नोटा छपाईची सर्व प्रक्रिया समजून घेतल्यानंतर ‘कट पॅक दोन’ विभागावर लक्ष केंद्रित केल्याने वेगळेच सत्य पुढे आले. कटपॅक सेक्शन व पॅकिंग विभागात १२ फेब्रुवारीला नोटांचा बंडल तपासल्यानंतर पुढे तो गहाळ झाल्याचे समोर आले. तसेच त्या ठिकाणी दुसराच बंडल चेक केल्याचे दिसून आले. दिल्ली येथील समितीनेही त्याच दिशेने तपास केल्याने मुद्रणालयातील अंतर्गत तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, या प्रकरणात आता उच्चपदस्थांची दिल्लीत धावाधाव सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये कपात अन्‌ मराठवाड्याला मात्र पाणी!

बंडल पंचिंग अधिकार कुणाला?

देशाचे चलन छपाईसारख्या महत्त्वाच्या कामात हलगर्जीचा प्रकार यानिमित्ताने उजेडात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सकृद्ददर्शनी मुद्रणालयातील कट पॅक (दोन) विभागात सदोष नोटा नष्ट करताना (पंचिंग) त्या नोटा शोधून त्यांच्या नोंदी घेऊन त्या विशिष्ट कामगारांमार्फत नष्ट करण्‍याची पद्धत आहे. मात्र या प्रकारात थेट दोन बंडलच नष्ट केले गेले. त्यामुळे बंडलच्या बंडल नष्ट करण्याचे अधिकार कामगारांना असतात का? वरिष्ठांनी कुणाच्या मार्गदर्शनानंतर बंडल नष्ट केले, असे मुद्दे समोर येत आहेत.

कामगार घटले, इंडेक्स वाढले

यानिमित्ताने मुद्रणालयात केंद्र सरकारच्या चलन नाणे विभागाने ठरवून दिलेली नोट छपाईची प्रमाणित कामकाज पद्धत (एसओपी) अवलंबली जात नसल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. विशेष म्हणजे मुख्य महाव्यवस्थापकांनी मुद्रणालयातील विभागप्रमुखांना मेल करून नोटाछपाईची प्रमाणित पद्धतच अवलंबण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे बघता, नोटाछपाईची प्रमाणित पद्धत का पाळली जात नव्हती, हा एक गंभीर प्रश्‍न आहे. त्यामागे मुद्रणालयात कामगारांची संख्या घटत असताना दुसरीकडे नोटाछपाईचे इंडेंट मात्र सातत्याने वाढत असल्याने कामाचा ताण वाढल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: नाशिक : प्रेसमधील नोटा चोरीप्रकरणात मुख्य व्यवस्थापकाची उचलबांगडी

loading image
go to top