पान तीन
----------------
शहरातील पार्किंग आरक्षण रद्द करू नये
माजी महापौर पाटील यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २७ : महापालिका हद्दीतील कुंभमेळ्याच्या आणि शहराच्या भविष्याच्या दृष्टीने नाशिक शिवारातील वाहनतळाचे आरक्षण उठवून रहिवासी विभागात बदल करू नये, अशी विनंती माजी महापौर दशरथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील कुंभमेळ्याच्या आणि शहराच्या भविष्याच्या दृष्टीने नाशिक शिवारातील आरक्षण क्र. १८६ व सर्व्हे नं. ४२५/ब मधील अंतिम भूखंड क्र. २७४ पैकी न.र.यो. क्र. १ मधील एकूण ३००५.०० चौ.मी. वाहनतळाचे (पार्किंग) आरक्षण उठवून रहिवासी विभागात बदल करण्याच्या हालचाली सुरु आहे.
शहरातील पार्किंगची समस्या अतिशय गंभीर असून वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या कडेला होत असलेल्या पार्किंगमुळे वाहनतळाचे आरक्षण उठवून रहिवासी विभागात बदल केल्यास नाशिककरांचा मोठा रोष उभा राहील. जागा मालकांनी महापालिका अथवा कायदेशीर आरक्षण भूसंपादन प्रक्रियेने ताब्यात घेण्याची मागणी केली असेल किंवा कायदेशीर अपीलात जाण्याची गरज असेल तर प्रशासनाने पुढील कायद्याच्या अधीन राहून तयारी करून हे आरक्षण भूसंपादनाने ताब्यात घेणे गरजेचे आहे. किंवा शासनाच्या नियमानुसार ए.आर. खालील ५० टक्के जागा महापालिकेला मिळणार असेल तर अशा प्रकारे आरक्षण कायदेशीर लढा किंवा नियमानुसार कारवाई न करणे हे नाशिकच्या दृष्टीने नुकसानीचे ठरणार आहे. म्हणून वाहन तळाचे आरक्षण जसे आहे तसेच ठेवावे, असे पाटील यांनी पत्रात नमूद केले.