
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत शहराच्या भाळी अखेर नगर परिषदेचा तिलक लागला आहे. नगर परिषद निर्णयाची घोषणा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सोमवारी (ता. १४) केली. नगर परिषदेच्या स्थापनेवरून सुरू असलेल्या पिंपळगावच्या राजकीय संघर्षात भारतीय जनता पक्षाचे सतीश मोरे हे बाजीगर ठरले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून नगर परिषद होणार की नाही, यावरून शिगेला पोहोचलेली उत्सुकता सोमवारी संपली. (Pimpalgaon Baswant finally got status of city council)
गेल्या १५ वर्षांपासून पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्याबाबत प्रयत्न सुरू होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून प्रलंबित नगर परिषदेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. निवडणुकीनंतर भाजपचे सतीश मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
त्यावर चार महिन्यांपूर्वी निकाल देताना शासनाने १२ सप्टेंबरपर्यंत पिंपळगाव शहराला नगर परिषदेचा दर्जा द्या, असे आदेश दिले होते. पण, राजकीय शह-काटशहात नगर परिषदेचा निर्णय लांबणीवर पडत होता. सतीश मोरे, बापूसाहेब पाटील दहा दिवसांपासून मंत्रालयात तळ ठोकून होते. महायुतीच्या सत्तेच्या माध्यमातून पिंपळगाव शहराला नगर परिषदेचा अंतिम अध्यादेश मिळविण्यात त्यांना यश आले.
सन २००७ मध्ये झालेली घोषणा व सध्याची लोकसंख्या, कृषक-अकृषक घटक, व्यापारी आदी नगर परिषदेचे निकष पूर्ण झाल्याने पिंपळगाव शहराला नगर परिषदेचा दर्जा दिल्याचे निर्णयात म्हटले आहे. नगर परिषदेसाठी शहराची हद्द निश्चित करण्यात आली आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे हे प्रशासक म्हणून काम पाहतील. (latest marathi news)
भास्करराव बनकरांच्या सत्तेचा कार्यकाळ पावणेदोन वर्षांचा
नगर परिषद अस्तित्वात आल्याने सत्ताधारी सरपंच भास्करराव बनकर यांची सत्ता संपुष्टात येईल. डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. सरपंच बनकर यांच्या गटाचे १२ सदस्य, तर विरोधी गटाचे पाच असे १७ सदस्य निवडून आले होते.
अवघ्या पावणेदोन वर्षांत सरपंच बनकर व १७ सदस्यांच्या पदावर गंडांतर आले आहे. आगामी जिल्हा परिषद गट व पिंपळगाव पंचायत समितीचा गण रद्द होणार आहे. नगर परिषदेनिमित्त सरपंच बनकर व सतीश मोरे यांच्यात अप्रत्यक्ष डाव-प्रतिडाव सुरू होते. नगर परिषद अस्तित्वात आल्याने अखेर मोरे या संघर्षात वरचढ ठरले आहेत.
"नगर परिषदेत आणण्यामाग कुणाला सत्तेतून पायउतार करावे, असा राजकीय उद्देश नाही. मी सरपंच म्हणून निवडून आलो असतो तरी नगर परिषदेसाठी प्रयत्न करण्याचे वचन पिंपळगावकरांना दिले होते. पिंपळगाव शहराला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्यात नगर परिषद महत्त्वाची भूमिका बजावेल. शासनाकडून नगर परिषदेला येणाऱ्या भरघोस निधीतून शहरात दर्जेदार विकासकामे साकारण्यात येतील."- सतीश मोरे, युवा नेते, भाजप
"नगर परिषदेबाबत मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहे. माझ्या गटाचे प्रमुख नेते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहतील."
- भास्करराव बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत
"सन २००७ मध्येच पिंपळगाव नगर परिषदेचा निर्णय शासनाकडून करून घेतला होता. आता न्यायालयाच्या आदेशानंतर १७ वर्षांनी उशिरा का होईना, नगर परिषद होणार आहे. विकासकामांसाठी करोडो रुपयांचा निधी आता मिळू शकेल. पिंपळगाव शहरात रस्ते, गटारींसह पायाभूत सुविधा उभारल्या जातील. नगर परिषदेचे स्वागत करतो."- दिलीप बनकर, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.