फोटो : A15162
नाशिक : खोदकामादरम्यान पाइपलाइन फुटून वाया जाणारे पाणी
--
पुन्हा पाइपलाइन फुटली
जुने नाशिकमध्ये हजारो लिटर पाणी वाया
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. ५ : खोदकामादरम्यान पाण्याच्या पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया जाण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गुरुवारी (ता. ४) रात्री आठच्या सुमारास येथील मोठा राजवाडा परिसरात भूमिगत केबलच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना पाइपलाइन फुटून पाणी वाया गेले. शहरात रोज कुठल्या ना कुठल्या भागात असा प्रकार घडत असताना महापालिका प्रशासन मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दिवाळीनंतर शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवले असून, पवित्र गंगा-गोदावरी पात्रही कोरडे पडले आहे. असे गंभीर चित्र असताना दुसरीकडे विविध विकासकामांच्या नियोजनाअभावी पाइपलाइन फुटून पाण्याचा अपव्यय होत आहे. ठोस नियोजनाचा अभाव आणि महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे वारंवार घडणाऱ्या या घटनांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.
मोठा राजवाडा भागात गुरुवारी रात्री अंधारात भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू होते. संबंधित ठिकाणी पाण्याच्या भूमिगत वाहिनीची माहिती नसल्याने जेसीबीच्या ड्रीलमुळे पाइपलाइन फुटली आणि पाण्याचे कारंजे उडाले. जुने नाशिक परिसरात आधीच पाणीटंचाई भासत असताना, ठेकेदाराच्या या निष्काळजीपणामुळे रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने या नियोजनशून्य कारभाराची तत्काळ दखल घेऊन अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. खोदकामापूर्वी आधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून भूमिगत पाईपलाईनच्या स्थानाची अचूक माहिती घेण्यात यावी, तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जुने नाशिकच्या नागरिकांकडून केली जात आहे.