फोटो :
....
ध्वजारोहण बंदोबस्त कार्यशाळेत पासेसचा बोलबाला
बंदोबस्ताच्या अनुभवातून पोलिसांचे ‘मास्टर क्लास’ प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या रामतीर्थावरील ध्वजारोहण सोहळ्याच्या अभेद्य बंदोबस्ताच्या अनुभवातून धडा घेत, सिंहस्थातील गर्दी व्यवस्थापन व सुरक्षेच्या सज्जतेसाठी नाशिक पोलिस दलातील तब्बल १२९ अधिकारी व ६०० अंमलदारांचे एकदिवसीय ‘डी-ब्रीफिंग व विशेष प्रशिक्षण’ कार्यशाळेचे बुधवारी (ता. ४) आयोजन करण्यात आले होते. या वेळी सोहळ्यात सहभागी जिल्हा प्रशासनासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पोलिस यंत्रणेच्या कामकाजाचे कौतुक केलेच, परंतु त्याचवेळी सिंहस्थ प्राधिकरणाकडून प्रमाणापेक्षाही अधिक पासेसचे वाटप केल्याने उडालेला गोंधळ आणि त्यातून उद्भवलेली पोलिस यंत्रणेशी बाचाबाचीचे प्रसंगी सांगत, कानपिचक्याही दिल्या.
ध्वजारोहण बंदोबस्तादरम्यान मिळालेले प्रत्यक्ष अनुभव, गर्दीच्या वेळी आलेली निरीक्षणे आणि स्थानिक त्रुटींचे सखोल विश्लेषण करून आगामी सिंहस्थात पोलिस दलाची व्यावसायिक क्षमता, तातडीने निर्णय घेण्याची क्षमता व आंतरविभागीय समन्वय सुधारणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले. या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, नाशिक ग्रामीणचे अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, राज्य गुप्तवार्ता नाशिक विभागाचे अधीक्षक अनिकेत भारती, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, महापालिकेचे मुख्य अभियंता अग्रवाल, जिल्हा प्रशासनाचे शरद घोरपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अरुंधती शर्मा, सिंहस्थ प्राधिकरणाच्या मीनाक्षी राठोड यांच्यासह प्रसार माध्यमांचे संपादक, प्रतिनिधींची उपस्थिती होती. कार्यशाळेमध्ये प्रामुख्यांनी पोलिस यंत्रणेच्या चोख बंदोबस्तामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळा निर्विघ्न पार पडला, अशी कौतुकाची थाप दिली. परंतु त्याचवेळी पासेसमुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले. सर्वसामान्य नागरिकांना सोहळ्याची अनुभूती प्रत्यक्ष घेता न आल्याचे दाखले देताना, सोहळा सर्वसमावेश होणे अपेक्षित होते, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर, प्राधिकरणाने वाटप केलेले पासेस यंत्रणांच्या अधिकार्यांना वेळेत मिळाले नाहीत. तसेच, प्रमाणापेक्षा अधिक वाटप झाल्याने ऐनवेळी आसनव्यवस्था अपुरी पडल्याचे निदर्शनास आणून दिले. परंतु आयुक्त कर्णिक यांनी सदर मुद्दा खोडून काढत, पासेसचा अर्थ जागा आरक्षित असा नसून, प्रथम येणाऱ्या आसनप्राधान्य होते. जागा नसल्यावर पोलिसांकडून प्रवेश बंद करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, गोदाघाटावर येण्याचे व जाण्याचे वेगवेगळे मार्ग असल्याने त्यातून चेंगराचेंगरीसाठी परिस्थिती उद्भवू नये हा त्यामागील उद्देश असल्याचेही स्पष्ट केले.
---
याविषयी झाली चर्चा
* ३१ ऑक्टोबरच्या बंदोबस्तातील प्रत्यक्ष अनुभव, गर्दीचे सूक्ष्म नियोजन आणि रमणी आयोगाच्या शिफारशी
* दहशतवादी आव्हाने, संशयास्पद हालचालींची तात्काळ ओळख व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
* जनसंवाद व वर्तणूक प्रशिक्षण : आंदोलने व धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी नागरिकांशी पोलीस दलाचा संयम, योग्य संवादकौशल्य व परिस्थिती कशी हाताळावी याबाबत मार्गदर्शन; विशेषतः नागरिकांशी पोलिसांनी संयम व आदराने संवाद साधण्याबाबत सूचना
* पोलिस, महापालिका, कुंभमेळा प्राधिकरण व इतर प्रशासकीय यंत्रणांमधील सुसूत्रता आणि परस्पर सहकार्यासाठी अधिक व्यापक स्वरूपाचा समन्वय साधण्यावर भर
* प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाशी समन्वय राखण्यासाठी तज्ज्ञांनी आगामी काळात घ्यावावयाच्या खबरदारीची जाणीव करून दिली.