
Nashik Police : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बदल्या
नाशिक : शहरात गुन्हेगारांनी डोके वर काढल्याने चौहूबाजुने नाशिक शहर पोलिसांवर टीकेची झोड उठलेली असताना, शहर पोलीस आयुक्तालयात सोमवारी (ता.२७) झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर आयुक्तांनी शहरातील काही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट केली. आयुक्तालयातील पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांसह दुय्यम निरीक्षकांची तातडीने बदल्या केल्या. सातपूर, अंबडसह पंचवटी, नाशिकरोड आणि सायबरच्या वरिष्ठ निरीक्षकांचा यात समावेश आहे.
नाशिकमध्ये काही दिवसांपासून गुन्हेगारांनी डोके वर काढले असून भरदिवसा कोयते, तलवारी घेऊन हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोमवारी आयुक्तालयात मॅरेथॉन बैठक घेत सायंकाळी शहरातील काही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.
त्यानुसार, नाशिकरोडचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांची पंचवटी, पंचवटीचे निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची सायबर, सायबरचे निरीक्षक सूरज बिजली यांची अंबड, अंबडचे निरीक्षक युवराज पतकी यांची मुंबई नाका, इंदिरानगरचे संजय बांबळे यांची विशेष शाखेत, अभियोग कक्षाचे निरीक्षक पवन चौधरी यांची नाशिकरोड दुय्यम निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासह नाशिकरोडचे दुय्यम निरीक्षक गणेश न्याहदे यांच्याकडे इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांसह नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अपेक्षा जाधव यांना चुंचाळे पोलिस चौकीत नियुक्त केले आहे. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने नवीन ठिकाणी रूजू होण्याचे आदेशही पोलिस आयुक्तांनी बजावले आहेत.
सातपूरचे चव्हाणही...
सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी ‘आर्थिक’ तक्रारींवरून विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यात कार्बन नाका परिसरातील गोळीबाराच्या घटनेमुळे पुन्हा तपासकामी चव्हाण यांना तातडीने सातपूर निरीक्षक पदी नियुक्त करण्यात आले होते. मात्र गेल्या महिनाभरापासून एका सहायक निरीक्षकांकडे सातपूरच्या प्रभारी पदाची सूत्रे होती. नवीन आदेशानुसार, चव्हाण यांच्याकडील सातपूरची पुन्हा जबाबदारी काढून घेण्यात आली असून, उपनगरचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्याकडे सातपूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे चव्हाण यांची पुन्हा गच्छंती झाल्याची चर्चा पोलीस आयुक्तालयात आहे.