पोलिसांचा चोख बंदोबस्त, व्यावसायिक नाराज
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३१ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या त्र्यंबकेश्वरमध्ये वाहनाने येण्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिस यंत्रणेवरील ताण अधिक वाढल्याने त्यांनी अतिरिक्त फौजफाटा कामाला लावला. नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील प्रत्येक गावात, चौकात आणि मुख्य ठिकाणी दिवसभर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्र्यंबकेश्वर शहरातही चौफेर पोलिस बंदोबस्त तैनात राहिल्यामुळे स्थानिक रहिवासी यांची चांगलीच कोंडी झाली.
राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या दौऱ्यामुळे शनिवारी नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतचे हॉटेल्स, दुकाने बंद ठेवले. तर त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यरस्त्यांवरील व्यावसायिकांना दुकाने, हॉटेल्स दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश होते. राष्ट्रपतींचा ताफा जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा सफेद पडदे लावून सुरु असलेल्या कामावर ‘पडदा’ टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथे सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नव्हता. पासधारकांनाच फक्त प्रवेश मिळाला. सायंकाळी राष्ट्रपतींचा ताफा नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले. त्र्यंबकवासियांनी सायंकाळी सुटकेचा निःश्वास टाकला.
...
राष्ट्रपतींचा बालकांशी संवाद
नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाने राष्ट्रपतींचा ताफा नाशिककडे जात असताना पिंपळगाव बहुला येथे रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या बालकांशी द्रौपदी मुर्मु यांनी संवाद साधत त्यांना चॉकलेट भेट दिले. तसेच त्यांच्या शिक्षणाबद्दल विचारपूस केली.
….
पुरीभाजी, गुलाबजाम
नवीन घाटांवरील ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत साधु-महंतांना भोजन देण्यात आले. पुरी, वांग्याची भाजी, पनीर, वरण भात आणि गोड पदार्थांमध्ये गुलाबजाम व रबडीचा समावेश होता. भोजनगृहाकडे जाताना साधूंना पोलिसांनी प्रतिबंध केल्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.