एन्कर
-------------
ठाकरे सेनेच्या दोन नावांवर शिक्कामोर्तब; भाजपमध्ये लॉबिंग
स्वीकृत नगरसेवक अर्जासाठी आज शेवटचा दिवस; हालचालींना वेग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : महापालिकेतील १० स्वीकृत नगरसेवकपदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत बुधवार (ता. ४) दुपारी ३ वाजेपर्यंत असून प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. एकूण दहा स्वीकृत सदस्यांपैकी शिवसेनेच्या (उबाठा) दोन नावांवर शिक्कामोर्तब झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे, तर भाजपमध्ये शंभराहून अधिक इच्छुक असल्याने मुंबईत लॉबिंग सुरु आहे.
शिवसेनेची नावे ठाण्यातून निश्चित होणार असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. उच्च न्यायालयाने सहा आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर आयुक्त मनीषा खत्री यांनी गटनेत्यांची बैठक घेऊन सुरुवातीला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र ३१ ऑक्टोबरच्या राष्ट्रपतींच्या ध्वजारोहण सोहळ्यामुळे ती ४ नोव्हेंबरपर्यंत वाढविली. संख्याबळानुसार भाजपला ६, शिवसेनेला २ आणि उबाठा-काँग्रेस आघाडीला २ जागांचा कोटा मिळाला आहे. एका जागेसाठी एकच अर्ज करता येणार असून अर्ज बाद झाल्यास संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागणार असल्याने पक्ष सावध आहेत. विरोधी गटातील दोन्ही जागांसाठी शिवसेनेने (उबाठा) जवळपास नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपमध्ये ६ जागांसाठी चुरस असून, इच्छुकांची मोठी यादी आहे. वरिष्ठ पातळीवर जोरदार लॉबिंग सुरू आहे. अंतिम यादी रात्री उशिरापर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. तूर्त तीन विधानसभा मतदारसंघात प्रत्येक आमदारांकडून एका नावाला पसंती देण्यात आल्याचे समजते. शिवसेनेच्या दोन नावांबाबतचा अंतिम निर्णय ठाण्यातून होणार असून, बुधवारी (ता. ४) दुपारपर्यंत तिन्ही पक्षांचे गटनेते आयुक्तांकडे अर्ज सादर करणार आहेत. त्यानंतर आयुक्तांचा प्रस्ताव महासभेत जाऊन महापौर स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करतील.
-------------चौकट
काँग्रेसची नाराजी
स्वीकृतसाठी शिवसेना (उबाठा) सोबत गटनोंदणी केलेल्या काँग्रेसला दोनपैकी एक स्वीकृत पद हवे आहे. त्यासाठी ठाकरे सेनेशी दोन हात करण्याचीदेखील तयारी आहे. परंतु गटनोंदणीनुसार शिवसेना (उबाठा) गटनेत्यांचा अंतिम निर्णय राहणार असल्याने उबाठा, काँग्रेस युती तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
--------------------------