
Nashik Politics : ''...तर आमच्या निर्णयाची सत्यात कळेल''; अजय बोरस्ते यांचा शिवसेना नेत्यांवर पलटवार
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून पक्ष बदलणाऱ्यांवर खोक्यांचा आरोप करण्याची नवीन फॅशन आली आहे. परंतु ज्यांना बाजारामध्ये कायम विकले जाण्याची सवय आहे, त्यांच्याकडूनच असे आरोप होत असून, आम्ही त्याला जास्त महत्त्व देत नाही.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पक्षाशी निष्ठावंत राहूनही ‘सिल्व्हर ओक’च्या प्रेमात असलेल्या तथाकथित नेत्यामुळे आपल्यावर कसा वेळोवेळी अन्याय झाला हा इतिहास तपासला, तर कदाचित माझ्यासह अकरा माजी नगरसेवकांच्या भूमिकेत सत्य असल्याची जाणीव त्यांना होईल, असा पलटवार शिंदे गटात प्रवेश केलेले व महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला.
हेही वाचा: एकनाथ शिंदे जागे व्हा! तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही; राष्ट्रवादीचा महत्त्वपूर्ण सल्ला
अजय बोरस्ते यांच्यासह १३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यानंतर शिवसेना कार्यालयात जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रवेशकर्त्या माजी नगरसेवकांवर गद्दार, लाचार या शब्दात आरोप केले. त्याचप्रमाणे अर्थकारणाशिवाय प्रवेश होऊ शकत नाही, असा गंभीर आरोप देखील केला. त्या पार्श्वभूमीवर श्री. बोरस्ते यांनी शनिवारी (ता. १७) माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावरील आरोपांचा खुलासा केला.
ते म्हणाले, की ज्यांनी स्वार्थासाठी युती तोडून आघाडी केली, त्यांना बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाची आठवण कशी राहणार? दहा वर्षांत शिवसेनेने मला भरभरून दिले, ते खरे आहे मात्र या सर्वांमागे गुणवत्ता हाच एकमेव निकष होता. गुणवत्ता होती म्हणूनच मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावरील महाआरती, शिवसेनेचे शेतकरी अधिवेशन यशस्वीरीत्या पार पाडल्याने खुद्द उद्धव ठाकरे यांनीच माझी पाठ थोपटली आहे.
हेही वाचा: सह्याद्रीचा माथा : शिवसेना उद्धव गटाचे जनता दल होऊ नये...
स्मारकाला शिवसेनेतूनच विरोध
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करण्यासाठी मी जिवापाड प्रेम केले. मात्र पक्षातील काहींनी वरिष्ठांकडे चुकीची माहिती पुरविताना स्मारकाच्या कामात अडथळे आणले. पक्षविरोधी काम करणारे अशा प्रवृत्तीसंदर्भात सर्वांनी एका सुरात तक्रारी केल्या, मात्र त्याची दखल घेतली नाही. असे स्पष्टीकरण बोरस्ते यांनी देताना यापुढे विरोधकांच्या आरोपांना विकासाच्या माध्यमातून उत्तरे देऊ, असे जाहीर केले. बाळासाहेबांची शिवसेना नाशिकमध्ये भविष्यात एक अत्यंत कीर्तिमान अशा पद्धतीने काम करून दाखवेन, भविष्यात आणखी काही हात आमच्याबरोबर जोडले जातील, असे सूतोवाच बोरस्ते यांनी करताना शिवसेनेला आणखी खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा: MNS Pune: पुणे शहर मनसेतील आणखी एका नेत्याची होणार हकालपट्टी; पदाधिकारी घेणार राज ठाकरेंची भेट
नाशिकच्या विकासासाठी झेंडा
आम्ही नाशिकच्या विकासासाठी शिंदे गटात प्रवेश केला. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत विकासकामांचा पाठपुरावा करण्याचे आमचे कर्तव्य आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील हेच बाळकडू आम्हाला दिल्याने एकमेकांशी पाय खेचण्याच्या राजकारणात न पडता विकासाच्या समृद्ध वाटेने जाण्यासाठी आम्ही नवीन झेंडा हाती घेतला आहे.