एन्कर
--
लोगो : जागतिक टपाल दिन
--
पत्रांच्या युगापासून डिजिटल पार्सलपर्यंत टपालाची घौडदौड
नाशिकच्या कार्यालयांनी जपला ऐतिहासिक, भावनिक वारसा
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. ८ : मोबाईलच्या एका क्लिकवर मेसेज पोहोचणाऱ्या आजच्या डिजिटल युगात पत्र लिहिण्याची सवय जवळपास इतिहासजमा झाली असली, तरी काही दशकांपूर्वी घराच्या दारात पत्र येणे म्हणजे आनंदाचा, उत्सुकतेचा आणि कधी काळजीचा क्षण असायचा. पोस्टमनच्या हातातील पत्रातून दूर गेलेली माणसे जवळ येत असत. नाशिकच्या जुन्या टपाल कार्यालयांनी अशाच असंख्य भावनिक आठवणींचा साक्षीदार होत संवादाचा हा ऐतिहासिक व भावनिक वारसा जपला आहे.
दरवर्षी ९ ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. १८७४ मध्ये स्वित्झर्लंड येथील बर्न येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाली. त्या स्मरणार्थ ९ ऑक्टोबर दिवस साजरा केला जातो. देशात आधुनिक टपाल व्यवस्थेच्या विकासाला १८५४ नंतर मोठी चालना मिळाली. त्यानंतर देशभर टपाल कार्यालयांचे जाळे विस्तारत गेले आणि पत्रे, पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्रे, मनीऑर्डर, नोंदणीकृत टपाल आणि पार्सल यांच्या माध्यमातून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी टपाल विभाग जोडला गेला. आजच्या डिजिटल युगातही ते नाते अतूट आहे. नाशिक शहराचा विस्तार होण्यापूर्वी मध्यवर्ती भाग, बाजारपेठा आणि जुन्या वसाहतींमध्ये टपाल सेवा नागरिकांसाठी संवादाचे प्रमुख माध्यम होती. जुन्या नाशिकसह पंचवटी, भद्रकाली, सराफ बाजार, रविवार कारंजा आणि परिसरातील व्यापारी आणि निवासी भागांमध्ये टपाल पोचविण्याचे काम पोस्टमन नियमितपणे करीत. त्या काळात घराचा अचूक पत्ता, गल्लीचे नाव आणि व्यक्तीची ओळख एवढ्याच आधारावर पत्र योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोस्टमनवर असत. शहर वाढत गेले तसे टपाल कार्यालयांचे कामही विस्तारले. सरकारी पत्रव्यवहार, व्यापारी कागदपत्रे, नोकरीची नियुक्तिपत्रे, परीक्षा अर्ज, मनीऑर्डर तसेच परदेशातून येणारी पत्रे यामुळे टपाल कार्यालये नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली.
---चौकट
बदलले स्वरूप
मोबाईल, ई-मेल, व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियामुळे वैयक्तिक पत्रव्यवहार कमी झाला असला तरी टपाल विभागाची गरज संपलेली नाही. स्पीड पोस्ट, पार्सल, नोंदणीकृत टपाल, सरकारी कागदपत्रे आणि विविध आर्थिक आणि नागरिक सेवा यामुळे टपाल व्यवस्था आजही महत्त्वाची आहे. ई-कॉमर्सच्या वाढीमुळे पार्सल वितरणाला नव्या स्वरूपात मोठी चालना मिळाली आहे. काळ बदलला, माध्यमे बदलली; पण माणसांना जोडण्याचे टपालाचे मूळ काम कायम आहे. पूर्वी पोस्टमनच्या सायकलीवरून येणारे पत्र आनंदाची बातमी घेऊन यायचे; आज त्याच टपाल व्यवस्थेतून पार्सल आणि महत्त्वाची कागदपत्रे घरपोच येतात. म्हणूनच टपाल दिन हा केवळ एका विभागाचा दिन नसून, माणसामाणसांतील संवादाचा आणि विश्वासाचा प्रवास स्मरणात ठेवण्याचा दिवस आहे.