स्वतंत्र ‘नाशिक टपाल क्षेत्रा’ला केंद्राची मंजुरी

स्वतंत्र ‘नाशिक टपाल क्षेत्रा’ला केंद्राची मंजुरी
Published on: 
स्वतंत्र ‘नाशिक टपाल क्षेत्रा’ला केंद्राची मंजुरी मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला अखेर यश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : उत्तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्र शासनाने स्वतंत्र ‘नाशिक टपाल क्षेत्रा’च्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रासाठी पाठपुरावा केला. केंद्राच्या टपाल विभागाने १२ ऑक्टोबर रोजी अधिकृत जाहिरात जारी करून या प्रस्तावाला अंतिम मान्यता दिली. नव्या निर्णयानुसार नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव आणि भुसावळ या पाच टपाल विभागांचा समावेश स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्रात करण्यात आला आहे. या अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील २३० टपाल कार्यालये आणि एक हजार ५०६ शाखा टपाल कार्यालयांचे कामकाज नाशिकमधून होणार आहे. यापूर्वी नाशिक आणि मालेगाव हे विभाग नवी मुंबई टपाल क्षेत्राशी, तर धुळे, जळगाव आणि भुसावळ हे विभाग छत्रपती संभाजीनगर टपाल क्षेत्राशी संलग्न होते. त्यामुळे परस्परांशी भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या जोडलेल्या विभागांचे प्रशासन वेगवेगळ्या कार्यालयांमार्फत चालत असल्याने समन्वयात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन मंत्री भुजबळ यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय दळणवळणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र पाठवून स्वतंत्र टपाल क्षेत्राची मागणी केली होती. गति-शक्ती धोरणाच्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातील टपाल व्यवस्थेचे एकत्रित नियोजन करण्याची गरज त्यांनी मांडली होती. त्यानंतर १७ जुलै २०२६ पर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर केंद्राने सकारात्मक निर्णय घेतला. हे नवे प्रादेशिक कार्यालय नाशिक येथील टपाल विभागाच्या विद्यमान इमारतीतच सुरू होणार असल्याने नव्याने पायाभूत सुविधा उभारण्याची गरज भासणार नाही. या कार्यालयामुळे प्रशासकीय समन्वय वाढून टपालसेवा, पार्सल हाताळणी आणि वितरण व्यवस्थेचे नियोजन अधिक सुलभ होणार आहे. समृद्धी महामार्ग, रेल्वेचे विस्तृत जाळे आणि नाशिकमधील हवाई वाहतुकीच्या संधीमुळे उत्तर महाराष्ट्रात मालवाहतूक आणि लॉजिस्टिकचे महत्त्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय केवळ प्रशासकीय पुनर्रचना नसून बदलत्या आर्थिक गरजांशी टपाल यंत्रणा सुसंगत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याचा लाभ शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. या निर्णयाबद्दल मंत्री भुजबळ यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचे आभार मानले असून, उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना अधिक सक्षम सुविधा मिळाव्यात, यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोट (फोटो घ्यावा) कार्यालयामुळे प्रशासकीय समन्वय वाढून टपालसेवा, पार्सल हाताळणी आणि वितरण व्यवस्थेचे नियोजन अधिक सुलभ होणार आहे. - छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com