धुळे ः टुडे ३ साठी
---
फोटो क्रमांक ः 31223
धुळे ः अग्रसेन हॉलमध्ये नरेडको नाशिकच्या प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ चे शुक्रवारी उद्घाटन करताना आमदार अनुप अग्रवाल. शेजारी महापौर मायादेवी परदेशी, नरेडको नाशिकचे अध्यक्ष शंतनू देशपांडे, राज्य उपाध्यक्ष जयेश ठक्कर, मानद सचिव भाविक ठक्कर, खजिनदार भूषण महाजन, समन्वयक प्रसन्न सायखेडकर, नितीन बंग आदी.
---
नरेडको नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो सुरू
अग्रसेन हॉलमध्ये धुळेकरांना मिळेल गृहप्रकल्पांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः नरेडको नाशिक आयोजित तीनदिवसीय प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ चे येथील पांझरा नदीकाठी असलेल्या अग्रसेन हॉलमध्ये आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. या प्रदर्शनात नाशिकमधील १०० हून अधिक गृहप्रकल्प एकाच छताखाली सादर करण्यात आले असून, घर, प्लॉट, जमीन व रो-बंगलो यांसह विविध मालमत्तांचे आकर्षक पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. यात सुमारे २० लाख रुपयांपासून १.५ कोटी रुपयांपर्यंतच्या विविध प्रकल्पांचा समावेश आहे.
शहरातील अग्रसेन हॉलमधील या प्रॉपर्टी एक्स्पोचा रविवारी (ता. ४) समारोप होणार आहे. या प्रदर्शनास दीपक बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स, नंदन बिल्डकॉनचे सहकार्य लाभले आहे.
रिअल इस्टेटला चालना
आमदार अग्रवाल यांनी सांगितले, की नाशिक शहराचा वेगाने विकास होत असून, या प्रदर्शनाच्या माध्यमातून धुळेकर नागरिकांना नाशिकमधील विविध गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे. नागरिकांना त्यांच्या गरजा व बजेटनुसार हक्काचे घर घेण्याची ही चांगली संधी आहे. नरेडको नाशिकचे अध्यक्ष शंतनू देशपांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले, की अशा प्रदर्शनांमुळे नाशिकचे ब्रँडिंग व मार्केटिंग होण्यासोबतच रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळते. विविध शहरांमध्ये अशा आयोजनांमुळे नाशिकमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते आणि शहराच्या विकासाला नवे आयाम प्राप्त होतात. या प्रदर्शनाला धुळेकरांचा अधिकाधिक प्रतिसाद लाभेल, हा विश्वास आहे.
हक्काच्या घराची संधी
नरेडको नाशिकचे मेंटॉर व नरेडको राज्य उपाध्यक्ष जयेश ठक्कर यांनी धुळेकरांना प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले. आपल्या स्वतःच्या शहरातून नाशिकमध्ये मालमत्ता खरेदी करण्याची ही उत्तम संधी असून, धुळेकरांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. समन्वयक प्रसन्न सायखेडकर यांनी कुंभनगरी नाशिकमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे परवडणारे व दर्जेदार पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले.