पिकअपमधून गोवशांची वाहतूक
नाशिक रोड पोलिसात ११ संशयितांविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : नाशिक रोड पोलिसांनी नाशिक - पुणे मार्गावर सापळा रचून गोवंशाची वाहतूक करणाऱ्या सात पिकअप वाहनांना ताब्यात घेतले. या वेळी दाटीवाटीने या वाहनातून १६ गोवंशाची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. संशयित चालकांकडे या वाहतुकीसंदर्भात कोणतेही परवाने नसल्याने गोवंशाची सुटका करीत गोशाळेत दाखल केले, तर संशयित ११ जणांविरोधात नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक रोड पोलिसांना गोरक्षकांनी पोलिसांनी पिकअपमधून कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक केली जात असल्याची खबर दिली होती. त्यानुसार, रविवारी (ता. २५) पहाटे फुलेनगर येथे सापळा रचला होता. संशयित एका पाठोपाठ एक सात पिकअप सिन्नरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी ते रोखले. या सातही पिकअपमध्ये तब्बल १६ गोवंश जनावरे दाटीवाटीने कोंबून भरलेली होती.
याप्रकरणी संशयितांकडे चौकशी केली असता, त्यांनी जनावरे ही सिन्नरच्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. परंतु त्यांच्याकडे सरपंच वा ग्रामसेवकाचा कोणताही परवाना नसल्याने ११ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुरलीधर तुकाराम वाघले (३९, रा. पळशी बु., ता. पेठ), जयराम भास्कर नाठे (४२, रा. पाडे, ता. दिंडोरी), निवृत्ती मधुकर खोडे (३०, रा. रोहिले, ता. त्र्यंबक), करण रतन गांगुर्डे (२६, रा. ब्राह्मणवाडी, ता. त्र्यंबक), श्रीकांत रतन गांगुर्डे (२८, रा. कासार, ता. शहापूर, जि. ठाणे), मोतीराम हरी वाघमारे (४५, रा. गावंडे, ता. पेठ), गंगाराम हनुमंत गवळी (६५, रा. करंजाळी, ता. पेठ), हेमराज पंडित पागी (२६, रा. शिंगदरे, ता. पेठ), शरद बाबूराव भांगरे (३८, रा. पिंपळवटी, ता. पेठ), ज्ञानेश्वर मखल भांगरे (२८, रा. पिंपळवटी, ता. पेठ), कमलाकर रामदास भोये (२९, रा. कुलवंडी, ता. पेठ) अशी संशयितांची नावे आहेत. तपास हवालदार मोरे करीत आहेत.