Nashik Bus Accident: ''दैव बलवत्तर म्हणून दार उघडले नाहीतर...'' प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Passenger saved in Bus Fire Accident incident

Nashik Bus Accident: ''दैव बलवत्तर म्हणून दार उघडले नाहीतर...'' प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव

नाशिक : येथील नाशिक- पुणे महामार्गावर एसटी बसने ब्रेक फेल झाल्यामुळे तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालय तथा काही रुग्णांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. नेमका हा अपघात कसा झाला. बसमधील प्रवासी यातून कसे बचावले याचा घेतलेला आढावा. (Nashik Pune highway near sinnar toll naka bus accident catch fire experience of travellers in bus)

...अन् आम्ही सिट वरून उडून खाली पडलो

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रुपाली या आपल्या भाचीच्या लग्नासाठी नाशिक येथे निघाल्या होत्या. ज्या बसचा अपघात झाला त्या बसमध्ये त्याही होत्या. रुपाली सांगतात, आम्ही नाशिकला येण्यासाठी सिन्नर येथून बस पकडली. शिंदे- पळसे येथे टोल नाका बसने ओलांडला मात्र पुढे बस थांबायला तयार नव्हती अन् अचानक बसच्या चालकाने गाडीतून उडी मारली. बस समोर चालत असलेल्या दुचाकींना चिरडत वेगात पुढे जात असताना समोर उभ्या दुसऱ्या बसला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की आम्ही सिट वरून उडून खाली पडलो. यात माझ्या लहान मुलीला गंभीर इजा झाली.

सोन- नाणं सगळं काही जळून खाक झालं...

बसच्या इंजिनमधून धुर येऊ लागताच बाहेर उभ्या नागरिकांनी आम्हाला बसमधून बाहेर येण्यासाठी मोठ मोठ्याने आरोळ्या दिल्या. मात्र बसच्या पुढील दाराच्या बाजुने धडक लागल्यामुळे मुख्य दरवाजा लॉक झाला होता. अन् तेथून बसने पेट घेतला. दैव बलवत्तर म्हणून अथक प्रयत्नांनी दरवाजा उघडला अन् आम्ही बसमधून बाहेर आलो. आम्ही बसमधून उतरून अगदी 10 पावलं चालतो तोच संपुर्ण बसने पेट घेतला. या बसमध्ये माझं सोनं अन् रोख रक्कम जळून खाक झाली. असा भयावह अनुभव रुपाली यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितला.

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

डिझेलचा फवारा माझ्या अंगावर उडाला अन्...

या बसमध्ये प्रवास करणारे अन् अपघातातून सुखरुप बचावलेले प्रवासी सिताराम कुरने सांगतात, मी कंडक्टर सीटवर बसलेलो होतो. आमच्या बसचे ब्रेक फेल झाले होते. त्यामुळे समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला बसने धडक दिली. मात्र जेव्हा पुढच्या बसला धडक दिली तेव्हा गाडीची डिझेलची टाकी फुटून सर्वत्र त्याचे फवारे उडाले. माझ्याही अंगावर डिझेल उडालं. त्याच क्षणी लक्षात आलं होत की ही बस आता पेट घेणार. म्हणून आम्ही सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होतो. सुरुवातील बसच दार लॉक झाल्यामुळे उघडलं नाही. मात्र त्याला जोरदार धक्का दिला तेव्हा ते दार उघडलं आणि आम्ही बसच्या बाहेर आलो आणि लगेचच बसने पेट घेतला.