नाशिक-पुणे रेल्वेमार्गाबाबत
जनसुनावणी घेण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ४ ः नाशिक-पुणे रेल्वेमार्गाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या डॉ. अनिल काकोडकर समितीची मुदत संपली आहे. तथापि, समितीने जनसुनावणी न घेतल्याने सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने नाराजी व्यक्त केली आहे.
९ ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनात केलेल्या मागण्यांचाही विचार करण्यात आला नसल्याने समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आंदोलनादरम्यान डॉ. अनिल काकोडकर समितीला मुदतवाढ देऊ नये आणि समितीने केवळ तांत्रिक बाबींचा विचार न करता सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन जनसुनावणी घ्यावी, अशा मागण्या केल्या होत्या.
सरकारचे प्रतिनिधी म्हणून निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत लेखी स्वरूपात मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यानुसार काकोडकर समितीला देण्यात आलेली ६० दिवसांची मुदत आज संपली. मात्र, अद्याप समितीने सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून जनसुनावणी घेतलेली नाही. त्यामुळे शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता झाली आहे का, असा प्रश्न सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने उपस्थित केला.
समितीची एक बैठक झाल्याची माहिती समोर आली असली तरी रेल्वेमार्गामुळे प्रभावित गावांतील नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि प्रवाशांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचना, मते व भावना जाणून घेण्यासाठी कोणतीही जनसुनावणी झालेली नाही. शासनाने लेखी आश्वासन देऊनही जनसुनावणी न घेतल्याने समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करताना प्रवाशांची संख्या, औद्योगिक विकास, मालवाहतुकीची गरज, स्थानिक रोजगाराच्या संधी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे हित या बाबींचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे समितीने आपला अहवाल सादर करण्यापूर्वी संबंधित सर्व घटकांची मते जाणून घ्यावीत, अशी मागणी केली आहे.
अहवाल सकारात्मक आल्यास त्याचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यात येईल. मात्र, अहवाल जनभावनांच्या विरोधात आल्यास पुन्हा व्यापक जनआंदोलन उभारण्याची तयारी केली जाईल, असा इशारा समितीचे सदस्य बबन वाजे, हरिभाऊ तांबे यांनी दिला.
औद्यौगिक संघटना आंदोलनात उतरणार
आगामी आंदोलनात सिन्नरमधील सर्व उद्योजक आणि सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आंदोलनात सहभागी होईल, असे सिमाचे विश्वस्त रतन पडवळ यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे कृती समितीचे सदस्य बबन वाजे, हरिभाऊ तांबे, प्रा. राजाराम मुंगसे, राजाराम मुरकुटे, दत्ताजी वायचळे, रतन पडवळ, मुकेश देशमुख, अरुण चव्हाणके. मारुती कुलकर्णी यांनी आपली भूमिका मांडली.