नाशिक विभागात ३४ टक्के पर्जन्यतुट

नाशिक विभागात ३४ टक्के पर्जन्यतुट
Published on: 
नाशिक विभागात पावसाची ३४ टक्के तूट --- नंदुरबारमध्ये निम्माच पाऊस, उपलब्ध पाणीसाठ्याच्या काटेकोर नियोजनाला सुरुवात गौरव जोशी : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा नाशिक विभागात मॉन्सूनने पाठ फिरवली असून, विभागात वार्षिक सरासरीच्या केवळ ६६ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. नंदुरबार जिल्ह्याची स्थिती सर्वाधिक चिंताजनक असून, तेथे वार्षिक सरासरीच्या निम्माच पाऊस झाला. पावसाची मोठी तूट लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी महसूल आणि जलसंपदा विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली. अवघ्या महाराष्ट्रावर यंदा मॉन्सूनची अवकृपा झाली आहे. राज्य सरकारने तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून ‘ट्रिगर-१’ अंतर्गत दुष्काळी उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांचा विचार करता पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे विभागातील ५४ पैकी तब्बल ४९ तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला. नाशिक विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७०७ मिलिमीटर आहे. यंदा मात्र केवळ ४६६ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत पावसात तब्बल ३४ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. विभागात धुळे जिल्ह्यात सर्वाधिक ८२ टक्के पावसाची नोंद झाली. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५३५ मिलिमीटर असताना प्रत्यक्षात ४३९ मिलिमीटर पाऊस झाला. त्याखालोखाल जळगावमध्ये ७७, नाशिकमध्ये ७०, तर अहिल्यानगरमध्ये केवळ ६८ टक्के पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या निम्म्याहून अधिक भागांतून मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे परतीच्या पावसाची उरलेली आशाही आता धूसर झाली. परिणामी, धरणे, पाझर तलाव आणि अन्य जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे राहिले आहे. विभागावर टंचाईचे ढग विभागात चालू वर्षी पावसाचे प्रमाण असमान राहिले. जुलैवगळता उर्वरित जून, ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली. विभागातील ५४ पैकी ३५ तालुक्यांत २१ ते २८ दिवसांपर्यंत, तसेच नऊ तालुक्यांत २८ ते ४२ दिवसांपर्यंत पावसाने खंड दिला. पावसाचा लहरीपणा लक्षात घेता दिवाळीनंतर बहुतांश तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल प्रशासन व जिल्हा परिषदांनी गावनिहाय टँकर सुरू करण्यासाठी नियोजनावर भर दिला. विभागातील पर्जन्य (मिमी) जिल्हा.........वार्षिक सरासरी.........यंदाचे पर्जन्य.........टक्केवारी नाशिक.........९३३.८.........६५४.५.........७०.१ धुळे.........५३५.१.........४३८.८.........८२ नंदुरबार.........८६०.४.........४२६.५.........४९.६ जळगाव.........६३२.६.........४८९.........७७.३ नगर.........४४८.१.........२९९.१.........६६.७ एकूण.........७०७.१.........४६५.६.........६५.८ --- सहा वर्षांतील पर्जन्य वर्ष........सरासरी (मिमी) २०२१.........७८५.० २०२२.........७८४.१ २०२३.........५५०.८ २०२४.........७८९.१ २०२५.........६९२.७ २०२६.........४६५.६ --- यंदाचे वर्ष ठरले नीच्चांकी नाशिक विभागातील गेल्या सहा वर्षांतील पावसाचे प्रमाण पाहता तीन वर्षे सरासरीपेक्षा अधिक तसेच निम्मी वर्षे सरासरीपेक्षा कमी पर्जन्याची नोंद झाली आहे. सन २०२१, २२ व २४ मध्ये सरासरीच्या ७८० मिमीहून अधिक पाऊस झाला; तर यंदाचे वर्ष हे सर्वाधिक भयावह ठरले असून, सहा वर्षांतील सरासरीच्या सर्वांत नीचांकी म्हणजेच ४६५.५ मिलिमीटर पर्जन्याची नोंद झाली. या आकड्यांवरूनच विभागातील दुष्काळाची गंभीर स्थिती लक्षात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com