टुडे साठी
------------
केवळ वृक्षारोपण पुरसे नाही, जगवणेही गरजेचे
क्रेडाई नाशिक मेट्रो, दिशा फाउंडेशनतर्फे आयुक्तांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : गोदावरीच्या काठावर उभं राहिलेलं रिव्हरफ्रंट मिनी फॉरेस्ट आणि मेडिटेशन पार्क आता केवळ वृक्षारोपणापुरतं मर्यादित राहू नये, तर तिथली झाडं खऱ्या अर्थाने जगली पाहिजेत, यासाठी महापालिकेकडे ठोस मागणी करण्यात आली आहे.
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त डॉ. मनीषा खत्री यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिलं. नव्याने लावलेल्या रोपांना नियमित पाणी, निगा आणि संरक्षण मिळावं यासाठी उद्यान व वृक्ष विभागाकडून स्वतंत्र पथक नेमावं, असा आग्रह या निवेदनात करण्यात आला आहे.
गेल्या १७ मे २०२६ रोजी क्रेडाई नाशिक मेट्रोची सीएसआर टीम, दिशा फाउंडेशन आणि महापालिका यांनी एकत्र येऊन गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं होतं. शहराचं हरित आच्छादन वाढवणं, गोदाकाठचं वातावरण संतुलित ठेवणं आणि नाशिकला अधिक पर्यावरणपूरक बनवणं, हा त्यामागचा उद्देश होता. परंतु केवळ झाडं लावून थांबणं पुरेसं नाही. रोपं रुजण्यासाठी पहिले काही महिने अत्यंत महत्त्वाचे असतात. वेळेवर पाणी मिळालं नाही, तर मेहनतीनं लावलेली झाडं सुकून जाण्याची भीती आहे, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. झाडांची योग्य काळजी घेतली तरच पुढच्या काही वर्षांत इथे दाट मिनी फॉरेस्ट तयार होईल आणि नागरिकांना त्याचा दीर्घकालीन फायदा मिळेल, असं क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. निवेदनावर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा, उपाध्यक्ष अनिल आहेर आणि दिशा फाउंडेशनचे समन्वयक रवी सानप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. गोदाघाटसारख्या वर्दळीच्या आणि भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी हे मिनी फॉरेस्ट टिकवणं, ही केवळ एका संस्थेची नव्हे तर संपूर्ण शहराची जबाबदारी असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे. महापालिका यावर काय निर्णय घेते, याकडे आता पर्यावरणप्रेमींचं लक्ष लागलं आहे.