फोटो CHE26B18098
नाशिक रोड : अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये तरुणाच्या बॅगेत सापडलेले नोटांचे गठ्ठे आणि ‘आरपीएफ’चे पोलिस निरीक्षक नवीन प्रताप सिंह, उपनिरीक्षक लवकुश वर्मा, सहायक उपनिरीक्षक दिनेश यादव.
--------------------
नाशिक रोड रेल्वेस्थानकात दीड कोटींची रोकड जप्त
---
अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये तरुणाच्या बॅगेत सापडले नोटांचे गठ्ठे; ‘प्राप्तिकर’कडे रोकड सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. १३ : छटपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकात सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अमृत भारत एक्स्प्रेसमधून तब्बल एक कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी संदीप बाळासाहेब भामरे (वय २४, रा. गोमवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली, सध्या रा. भवानी पेठ, जळगाव) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. रोकडच्या स्रोताबाबत समाधानकारक माहिती व वैध कागदपत्रे सादर करता न आल्याने रोकड आणि तरुणाला पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण पथकाकडे सुपूर्द करण्यात आले.
गुरुवारी (ता. १२) नाशिक रोड रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर २२११२ क्रमांकाची अमृत भारत एक्स्प्रेस दाखल होत असताना ‘आरपीएफ’चे जवान तपासणी करीत होते. या वेळी जळगावहून मुंबईकडे बॅग घेऊन जाणाऱ्या संदीप भामरे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने जवानांनी त्याला थांबवून चौकशी केली.
बॅगेतील साहित्याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपनिरीक्षक लवकुश वर्मा आणि सहायक उपनिरीक्षक दिनेश यादव यांनी पंचांच्या उपस्थितीत बॅगेची तपासणी केली. त्यात पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचे गठ्ठे आढळले. मोजणीअंती एक कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड असल्याचे स्पष्ट झाले.
पाचशेच्या नोटांचे २९ हजारांवर गठ्ठे
जप्त रोकडमध्ये ५०० रुपयांच्या २९ हजार ३२२ नोटा (एक कोटी ४६ लाख ६१ हजार रुपये), २०० रुपयांच्या ७१५ नोटा (एक लाख ४३ हजार रुपये) आणि १०० रुपयांच्या ६०० नोटा (६० हजार रुपये) यांचा समावेश आहे. संबंधित तरुणाकडे जनरल प्रवास तिकीटही आढळले.
रोकडच्या मोठ्या रकमेबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने ‘आरपीएफ’ने नाशिकच्या प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण युनिट एकच्या उपसंचालकांना माहिती दिली. त्यानंतर रोकड व तरुणाला प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
भुसावळ विभागाचे वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाशिक रोड आरपीएफ पोस्टचे निरीक्षक नवीन प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
कोट
जप्त करण्यात आलेली एक कोटी ४८ लाख रुपयांची रोकड प्राप्तिकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. नाशिक रोड रेल्वेस्थानकातून धावणाऱ्या गाड्यांवर ‘आरपीएफ’चे अधिकारी व कर्मचारी सातत्याने लक्ष ठेवून असतात. प्रवाशांची चौकशी तसेच त्यांच्या सामानाची तपासणी केली जाते. याच नियमित तपासणीदरम्यान ही रोकड आढळली.
- नवीन प्रताप सिंह, पोलिस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), नाशिक रोड