नाशिक रोड: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया सिक्युरिटी प्रेस येथे सोमवारी (ता. ११) सायंकाळी मॉक ड्रिल झाले. सशस्त्र अतिरेक्यांनी प्रेसवर हल्ला केल्याचा प्रसंग साकारण्यात आला, ज्यात सुरक्षा दलांनी यशस्वीरीत्या प्रत्युत्तर दिले. प्रात्यक्षिकात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांनी चार अतिरेक्यांना ठार मारले आणि एकाला ताब्यात घेतले. या चकमकीत एक कामगार जखमी झाल्याचेही दाखवले. या वेळी बॉम्बशोधक पथक, बॉम्ब निकामी पथक, श्वान पथक (श्वान लकीसह) तसेच अग्निशमन दल आणि डॉक्टरांचे पथकही मोहिमेत सामील झाले होते.