एन्कर किंवा सेकंड मेन
फोटो : B17981
नाशिक रोड : रेल्वेस्थानकावर सुरू असलेले पादचारी पुलाचे काम
रेल्वे स्थानकावर दोन नवीन पादचारी पूल, लिफ्ट
सरकते जिनेही मिळणार; भाविकांचा प्रवास होणार अधिक सुकर
नाशिक रोड, ता. २२ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या विकासकामांना वेग आला आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन स्थानकावर दोन नवीन पादचारी पूल उभारण्यात येत असून, लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांच्या सुविधांचाही विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी निधी मंजूर झाला आहे. या सुविधांमुळे भाविकांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांची ये-जा अधिक सुलभ होणार आहे.
सिंहस्थाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने पादचारी मार्गांची क्षमता वाढविण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. रेल्वे पार्सल कार्यालयासमोरील विद्यमान पादचारी पुलाच्या बाजूला नवीन पूल उभारण्यात येत आहे. हा पूल फलाट क्रमांक एकपासून सुरू होऊन फलाट क्रमांक चारच्या सिन्नर फाटा बाजूला असलेल्या जुन्या रेल्वे वसाहतीलगत उभारण्यात येणाऱ्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना नवीन इमारतीत प्रवेश करणे सोयीचे होणार आहे. या पुलावर फलाट क्रमांक एक, दोन-तीन आणि चार येथे चढ-उतारासाठी रॅम्पची सुविधा देण्यात येणार आहे. नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर त्याच्या शेजारील जुना पूल हटविण्याचे नियोजन आहे. फलाट क्रमांक एकची लांबी रेल्वे पोलिस ठाण्यापुढे मालधक्क्याच्या दिशेने वाढविण्यात येणार आहे. या भागात सुमारे ४० फूट रुंदीचा आणखी एक नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. तो फलाट क्रमांत चार ते फलाट क्रमांक एक वर सुभाष रोडकडे उतरविण्यात येत आहेत. त्यामुळे फलाट क्रमांक चारजवळील सिंटी लिक बस डेपोवरून प्रवासाना सरळ रेल्वे स्थानकांवर जाता येईल. या पुलावर एकूण सहा सरकते जिने बसविण्यात येणार आहेत.
--चौकट
चारही फलाटांवर सुविधा
सध्या स्थानकावर पादचारी पुलांसह विविध फलाटांवर लिफ्ट, पायऱ्या, रॅम्प आणि सरकत्या जिन्यांची सुविधा उपलब्ध आहे. नवीन विकासकामांमुळे या सुविधांमध्ये वाढ होणार आहे. कुंभमेळ्यापूर्वी पादचारी पुलांचे काम पूर्ण करून प्रवाशांची गर्दी नियंत्रित करणे, फलाटांदरम्यानची वाहतूक सुलभ करणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यवस्था सक्षम करणे हे रेल्वे प्रशासनासमोरील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.