NSK26H33614
नाशिक : जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेतर्फे (सीआयटीयु) विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोेर आंदोलन करताना.
------------------
पोषण आहाराची सेंट्रल किचन प्रणाली बंद करा
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची निदर्शने, मागण्याचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : शालेय पोषण आहारासाठी प्रस्तावित‘सेंट्रल किचन प्रणाली रद्द करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेने सोमवारी (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात शासनाने १२ ऑक्टोबर २०२६ ला घेतलेल्या निर्णयानुसार शहरी व ग्रामीण भागांत ‘सेंट्रल किचन‘ प्रणाली राबविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात आला. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना ताजा, गरम आणि सकस आहार मिळण्याबाबत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या २३ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या हजारो महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही गदा येणार आहे. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहार तयार करून तो विविध शाळांमध्ये पोहोचविण्यात येणार आहे. मात्र, शाळांपर्यंत अन्न पोहोचविण्यास लागणारा वेळ, वाहतुकीतील अडचणी आणि अन्नाच्या गुणवत्तेचा प्रश्न यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांना शाळेतच ताजा, स्वच्छ आणि वेळेत आहार मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष देविदास आडोळे, सरचिटणीस सुदाम पावडे, छाया जाधव, प्रीतीराम ठोंबरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले.
---
१६-१
या आहेत मागण्या
- कर्मचाऱ्यांचे जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील थकीत मानधन द्यावे
- शासनाने जाहीर केलेली १ हजार रुपयांची मानधनवाढ फरकासह लागू करावी
- कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेत किमान १७ हजार वेतन द्यावे
- कर्मचाऱ्यांना पीएफ आणि इएसआयसी योजना लागू करावी
-बारा महिन्यांचे मानधन देताना ५ हजार दिवाळी बोनस मंजूर करावा
------------------