टूडे साठी
-----------
सिंहस्थाच्या खर्चात अडकलेल्या मनपाला दिलासा
मुद्रांक अधिभारातून २१.२५ कोटींचे अनुदान मंजूर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मोठ्या विकासकामांमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या महापालिकेला राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. नगरविकास विभागाने २०२६-२७ साठी मुद्रांक शुल्कावरील एक टक्का अधिभारातून राज्यातील २८ महापालिकांना एकूण ४२१ कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यात नाशिकच्या वाट्याला २१ कोटी २५ लाख रुपयांपेक्षा अधिकचा निधी आला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १४९-अ नुसार शहरातील मालमत्तेच्या विक्री, देणगी आणि भोगवटा गहाण व्यवहारांवर मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार आकारला जातो. यातून जमा होणारी रक्कम संबंधित महापालिकांना अनुदान म्हणून दिली जाते. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीतूनच हा निधी वितरित करण्यात येणार आहे. शहरात सध्या रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांची कामे वेगात सुरू आहेत. त्यामुळे तिजोरीवर पडलेला ताण काही प्रमाणात या अनुदानामुळे हलका होणार आहे. मात्र हा निधी नेमका कोणत्या कामांवर खर्च होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------
महापालिकानिहाय अनुदान असे (रुपये)
- नाशिक- २१ कोटी २५ लाख ६७ हजार २७६
- पुणे- १०९ कोटी ५४ लाख ६४ हजार ५७०
- ठाणे- ९६ कोटी २६ लाख ८० हजार ७८२
- पिंपरी-चिंचवड- ४७ कोटी ७३ लाख
- वसई-विरार- १७ कोटी ४७ लाख
- नवी मुंबई- १७ कोटी ४७ लाख
- मीरा-भाईंदर- १६ कोटी १३ लाख
-------------------------