सिंहस्थासाठी ४३ दिवसांचा पाणीसाठा राखीव ठेवा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ प्राधिकरणाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे धरणांमधील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमृतस्नानाच्या तीन प्रमुख पर्वण्यांसाठी धरणांमध्ये ४३ दिवसांचा पाणीसाठा राखीव ठेवावा, अशी मागणी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस झाला आहे. परिणामी खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. राज्य सरकारने जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून ट्रिगर-१ अंतर्गत उपाययोजना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना सरकारने दिल्या आहेत.
त्यामुळे धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा सध्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी जपून वापरावे लागणार असल्याने जिल्ह्यातील शहरी व निमशहरी भागात आगामी काळात १० टक्के पाणीकपात लागू होण्याची शक्यता आहे.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणारे लाखो भाविक तसेच साधू-महंतांच्या पाण्याची व्यवस्था हा मोठा प्रश्न ठरणार आहे. त्यामुळे सिंहस्थ प्राधिकरणाने आत्तापासूनच पाण्याचे नियोजन सुरू केले आहे.
नाशिक शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन सिंहस्थासाठी ४३ दिवसांचा पाणीसाठा धरणांमध्ये राखीव ठेवावा, अशी विनंती प्राधिकरणाने जिल्हा प्रशासनाला केली आहे. पुढील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत हा राखीव साठा वापरण्याचे नियोजन आहे. याच कालावधीत अमृतस्नानाच्या तीन प्रमुख पर्वण्या होणार असल्याने साधू-महंत आणि लाखो भाविकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी प्राधिकरणाने ही मागणी केली आहे. दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याला असलेले प्राधान्य पाहता जिल्हा प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
दररोज ६०० दशलक्ष लिटर पाणी
नाशिक शहराला दररोज साधारण ५०० ते ६०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. हे प्रमाण लक्षात घेऊन सिंहस्थासाठी ४३ दिवसांचा पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अमृतस्नानाच्या पर्वण्या होत असताना हा साठा वापरण्यात येणार आहे.