टूडे मेन
फोटो : H33739
----------------
देवाधिदेवांना सिंहस्थाचे पहिले आमंत्रण
त्रिवेणी संगमावर नाशिककरांचे साकडे; निमंत्रण पत्रिका देवतांच्या चरणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २८ : बारा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पवित्र पर्वाची नांदी बुधवारी (ता. २८) नाशिकच्या पावन भूमीत मोठ्या भक्तिभावात झाली. आगामी सिंहस्थ निर्विघ्न आणि मंगलमय व्हावा यासाठी थेट देव- देवतांनाच निमंत्रण देण्याचा आगळावेगळा सोहळा पंचवटीत पार पडला.
पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर आणि श्री कपालेश्वर महादेव मंदिरात महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते कुंभमेळ्याची पहिली अधिकृत निमंत्रण पत्रिका देवतांच्या चरणी अर्पण करण्यात आली. या वेळी सिंहस्थाच्या यशस्वी आयोजनासाठी आशीर्वाद मागितला. त्यानंतर अरुणा, वरुणा आणि गोदावरी या पवित्र त्रिवेणी संगमावर वैदिक मंत्रोच्चारात तीर्थ पूजन करण्यात आले. पुरोहितांच्या हस्ते शास्त्रोक्त पूजा करून, गोदामातेला कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी साकडे घालण्यात आले. संपूर्ण परिसर हर हर महादेव आणि गोदामातेच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या ऐतिहासिक आणि धार्मिक उपक्रमाला मोठी उपस्थिती लाभली. वैष्णवी आखाड्याचे प्रवक्ते भक्तीचरणदास महाराज, भाजप प्रदेश संघटनमंत्री अजय जामवाल, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, पंचवटी प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी उपस्थित होते.याशिवाय पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सरचिटणीस प्रतीक शुक्ल, काळाराम मंदिराचे विश्वस्त अक्षय कलंत्री, शांताराम अवसरे, धनंजय पुजारी, दिगंबर धुमाळ, महेश महांकाळे यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवतांना निमंत्रण देऊन सिंहस्थाच्या तयारीचा आध्यात्मिक श्रीगणेशा झाल्याने नाशिकमध्ये कुंभपर्वाची उत्साहपूर्ण चाहूल लागली आहे.
------------------
निर्विघ्न पर्वासाठी प्रार्थना
*काळाराम मंदिर : प्रभू श्रीरामांच्या चरणी सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली निमंत्रण पत्रिका अर्पण करून निर्विघ्न पर्वासाठी प्रार्थना करण्यात आली.
*कपालेश्वर मंदिर : महादेव कपालेश्वराचे शास्त्रोक्त पूजन करून महादेवाच्या चरणी निमंत्रण पत्रिकेसह अर्घ्य अर्पण करण्यात आले.
*त्रिवेणी संगम : अरुणा, वरुणा आणि गोदावरीच्या संगमावर तीर्थपूजन करून जलदेवतेला व गोदामातेला कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी साकडे घालण्यात आले.