मेन
फोटो : H32790
--------------
दूषित पाण्यातून १०६ जणांना त्वचारोग
महापालिकेचे दत्तनगरला आरोग्य तपासणी शिबिर; १४ लहान मुलांनाही संसर्ग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : अंबडच्या दत्तनगर परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, त्याचा सर्वाधिक फटका त्वचेला बसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शनिवारी (ता. १७) आयोजित केलेल्या विशेष मोफत आरोग्य शिबिरात तपासणी केलेल्या २०२ पैकी १०६ रुग्णांना त्वचारोग झाल्याचे निष्पन्न झाले.
अंबड येथील दत्तनगर परिसरातील तुळजाभवानी मंदिरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलट्या, जुलाब, त्वचेवर पुरळ आणि खाज सुटण्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाने तातडीने हे शिबिर घेतले. या शिबिरात एकूण २०२ रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी तब्बल १०६ रुग्ण म्हणजे ५२ टक्क्यांहून अधिक रुग्ण त्वचारोगाचे आढळले. यात ६१ महिलांचा समावेश सर्वाधिक असून, ३१ पुरुष आणि १४ लहान मुलांनाही त्वचेचा संसर्ग झाला आहे. दूषित पाण्याच्या संपर्कामुळे हा प्रादुर्भाव वाढल्याचे डॉक्टरांचे मत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शिबिरात एकाच ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या. फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ आणि दंत शल्यचिकित्सक यांनी तपासणी केली. तसेच रक्त तपासणी लॅब, एक्स-रे आणि मोफत औषध वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. गरजू रुग्णांचे जागेवरच रक्त नमुने आणि एक्स-रे काढण्यात आले. यापूर्वीच्या शिबिरात उपचार घेतलेल्या रुग्णांनीही या शिबिराला आवर्जून भेट दिली. त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून, अनेकजण पूर्णपणे बरे झाल्याचे त्यांनी सांगितले. शिबिराची पाहणी करण्यासाठी आमदार सीमा हिरे, आरोग्य सभापती डॉ. पुनम महाले, उपसभापती सतीश निकम, नगरसेविका प्रियांका दोंदे, किरण दराडे, नितीन दातीर, किरण राजवाडे यांनी भेट दिली. आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. अजिता साळुंखे, डॉ. देविदास नरोटे यांनी शिबिराचे नियोजन केले.
-----------------------