Nashik News | नाशिक स्मार्टसिटी कंपनी ट्रायजेनला गुंडाळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Nashik SmartCity

नाशिक स्मार्टसिटी कंपनी ट्रायजेनला गुंडाळणार

नाशिक : वाढत्या वाहतुकीबरोबरचं शहरात पार्किंग समस्या जटिल होत असल्याने स्मार्टसिटी कंपनीने शहरात पार्किंग स्लॉट सुरू करण्याचा तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार अद्यापही काम सुरू न झाल्याने दरवाढीसाठी आडून बसलेल्या ट्रायजेन कंपनीला अखेरचा अल्टिमेटम देत ठेकाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्मार्टसिटी कंपनीच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

स्मार्टसिटी कंपनीतर्फे शहरात पीपीपी तत्त्वावर २८ ऑनस्ट्रीट, ३३ ऑफस्ट्रीट पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. पार्किंगचे लॉट्सही पाडले. त्यासाठी कंपनीने निविदा प्रक्रिया लांबविली. त्यात ३३ ऑफ स्ट्रीटच्या पार्किंग व्यवस्थापनाची जबाबदारी ट्रायजेन टेक्‍नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आली. कंपनीला सुरवातीला २२ पार्किंग लॉट्स उपलब्ध करून देण्यात आले. पार्किंगवर उभ्या राहणाऱ्या वाहनांसाठी दर निश्‍चिती करण्यात आली. दुचाकींसाठी प्रतितास पाच, चारचाकी वाहनांसाठी प्रतितास दहा रुपये दर निश्‍चित करण्यात आला. दहा वर्षांसाठीचा हा करार आहे. जानेवारी २०२० मध्ये पार्किंग स्लॉटवरून वसुली केली जाणार होती. गंगापूर रोड भागात वसुलीही सुरू झाली.

मात्र, कोरोना संसर्गाची पहिली लाट आल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आला. याचा फायदा घेत कंपनीने आडमुठेपणाचे धोरण स्वीकारले. कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाल्याने दुचाकीचे प्रतितास १५, चारचाकीचे प्रतितास ३० रुपये शुल्क निश्‍चित करावे व आणखी तीन वर्षांची मुदतवाढ द्यावी, असे पत्र स्मार्टसिटी कंपनीला दिले. महापालिकेने दीड वर्ष मुदतवाढ देण्याचे मान्य केले. त्याचबरोबर टोइंग सुविधाही करण्यास मान्यता देताना शुल्कवाढ फेटाळली. मात्र, ट्रायजेन कंपनीने शुल्कवाढीचा रेटा कायम ठेवला. त्याशिवाय पार्किंग सुरू करणार नसल्याचे ठासून सांगितले. त्यानंतर स्मार्टसिटी कंपनीने अनेकदा पत्रव्यवहार केला. पत्राला उत्तर न मिळाल्याने ट्रायजनेचा ठेका रद्द करण्याचा निर्णय स्मार्टसिटी कंपनीने घेतला असून, संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला आहे. कंपनीचे कंत्राट रद्द झाल्यानंतर नव्याने प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Web Title: Nashik Smart City Company Will Run A Parking Slot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikParking
go to top