तलवार, कोयते, चॉपरचा हल्ल्यांमध्ये सर्रास वापर
स्ट्रीट क्राईम चिंताजनक; सातपूरला दोन, सिडकोत एक प्राणघातक हल्ला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : सातपूर येथील प्रबुद्धनगर, आंबेडकर चौक परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमादरम्यान दोन घटनांमध्ये टोळक्यांनी कुरापत काढून तलवार, कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी सातपूर पोलिसात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सिडकोमध्ये किरकोळ कारणातून संशयिताने युवकाच्या पोटात चॉपर खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळा अशोक पटेकर, पुष्पराज घुगे, सार्थक गोवर्धने यांच्यासह अज्ञात दोन-तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वैभव पुंजाराम साबळे (२२, रा. शिवदीप अपार्टमेंट, श्रमिकनगर, सातपूर) याच्या फिर्यादीनुसार, तो सोमवारी (ता. १९) रात्री प्रबुद्धनगरमधील आंबेडकर चौकात गरबा कार्यक्रमास गेला होता. संशयितांनी जुन्या भांडणाची त्यांनी कुरापत काढून वैभव याच्याशी वाद घातला. संशयितांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. गोवर्धने याने तलवार वैभवच्या डोक्यात मारली. तर, संशयित घुगे याने कोयता वैभवच्या डोक्यात मारला. तर अन्य संशयितांनी संधी साधून दांडक्याने बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनिरीक्षक प्रदीप पवार हे तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत सावतानगर बस स्टॉप येथे मोबाईलच्या पैशांची मागणी करत वाद घालून एका तरुणाच्या पोटात चॉपर खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सोमवारी रात्री फिर्यादी कैलास विष्णू टिळे (५३, रा. पवननगर, सिडको) यांचा भाचा भूषण विलास एखंडे हा सावतानगर बस स्टॉपजवळ उभा असताना संशयित रितेश मराठे (रा. पवननगर, सिडको) व त्याचे दोन साथीदारांनी मोबाईलच्या पैशांवरून वाद घातला. रितेश याने भूषणचा मोबाईल बळजबरीने हिसकावून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व पोटात डाव्या बाजूस चॉपर खुपसून गंभीर जखमी केले व पसार झाले. याप्रकरणी उपनिरीक्षक नवगिरे तपास करत आहेत.
---
तरुणावर कोयत्याने हल्ला
सातपूर येथील आंबेडकर चौकात दांडिया खेळण्यावरून झालेल्या वादातून एका २८ वर्षीय तरुणावर १० ते १५ जणांच्या टोळक्याने तलवार, कोयता आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. शुभम नाना पानपाटील (२८) असे जखमी युवकाचे नाव आहे. तर, त्याची आई प्रतिभा पानपाटील (४५, रा. प्रबुद्धनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री दांडियात वाद झाला होता. शुभम नाना पानपाटील (२८) हा घरी परतत असताना संशयित रवी पारवे, वैभव साबळे, रोहित मोरे, तुषार डोळशे, सुनीता डोळशे, उषा नाईक, सोनल डोळशे, शीतल डोळशे, कोमल डोळशे, सोनू गांगुर्डे व इतर ४ ते ५ जणांनी त्यास अडवून तलवार, कोयता व रॉडने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बोरसे तपास करीत आहेत.