वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस ॲक्शन मोडमध्ये
रामतीर्थ परिसर आणि पार्किंगच्या जागांवर स्टॉल्स न उभारण्याचे पत्र
नाशिक, ता. २३ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था कोलमडू नये, म्हणून फटाके आणि इतर विक्री स्टॉल्सना परवानगी देऊ नये, अशी लेखी मागणी शहर वाहतूक शाखेने महापालिकेकडे केली आहे. शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र पाठवले आहे.
३० ऑक्टोबरला सिंहस्थानिमित्त नगरप्रदक्षिणा मिरवणूक निघणार आहे. तर ३१ ऑक्टोबरला रामतीर्थावर मुख्य ध्वजारोहण सोहळा होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, आखाड्यांचे साधू-महंत, राजकीय नेते आणि हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत.
दिवाळीनिमित्त रविवार कारंजा, धुमाळ पॉईंट, मेनरोड परिसरात मोठ्या प्रमाणावर स्टॉल्स लागतात. तसेच बी. डी. भालेकर मैदान (शालीमार), छत्रपती संभाजी महाराज गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल (सीबीएस), रुंगठा हायस्कूल, शासकीय कन्या विद्यालय (सीबीएस), मालेगाव स्टँड ते मखमलाबाद नाका, होळकर पूल आणि इंद्रकुंड ही ठिकाणे वाहन पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या जागांवर जर फटाक्यांचे स्टॉल्स उभारले, तर मिरवणूक आणि ध्वजारोहण सोहळ्यासाठी जागाच उरणार नाही. त्यामुळे संपूर्ण शहराची वाहतूक विस्कळीत होईल, अशी भीती वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वरील सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे स्टॉल उभारण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश अतिक्रमण विभागाला द्यावेत, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.