पान एक मेन
-----------------
32167, 32165
नाशिक : शहरातील मुख्य चौक असलेल्या सीबीएस चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने मंगळवारी झालेली वाहतूक कोंडीत अडकलेले वाहनचालक.
शहरातील सिग्नल यंत्रणा कोलमडली
वीज देयके अदा न झाल्याने १२ तास पुरवठा खंडीत; चौकांमध्ये कोंडी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरु असल्याने वीजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी सूर्योदय ते सुर्यास्तापर्यंत शहरी भागातील पथदीप बंद करण्यात आल्याने त्याचा परिणाम शहरातील सिग्नल यंत्रणा दिवसभर बंद राहिल्याने वाहतुक ठप्प झाली. दरम्यान पथदीपांचे वीज देयके अदा न केल्याने वीज पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात आले. परंतु, महापालिकेच्या विद्युत विभागाने याला नकार दिला असून वीज देयके पूर्णपणे अदा केल्याचा खुलासा करताना महावितरणकडून वीज पुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगितले. तर पोलिसांच्या वाहतूक शाखेने देखील महावितरण कडून वीजपुरवठा बंद असल्याने सिग्नल यंत्रणा बंद असल्याची माहिती दिली.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात विकास कामे सुरु आहे. विकासकामांमध्ये मुख्यत्वे २८ रस्त्यांची व थेट पाइपलाइन योजनेची कामे सुरु आहेत. रस्ते कामांमुळे जागोजागी खड्डे खोदल्याने अपघात होत आहे तर मोठ्या प्रमाणात एकेरी वाहतूक करण्यात आल्याने जागोजागी वाहतूक ठप्प होत आहे. एकीकडे खड्ड्यांचा मनस्ताप सहन करणाऱ्या नाशिककरांना मंगळवारी बंद पडलेल्या सिग्नल यंत्रणांनी डोकेदुखी वाढविली. शहरातील वर्दळीचे मुख्य सिग्नल बंद बारा तास बंद असल्याने जागोजागी वाहतूक ठप्प झाली. विशेष करून सिबीएस, त्र्यंबक नाका, गडकरी चौक हे सिग्नल बंद असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. ऑक्टोबर हिट, बंद सिग्नल यंत्रणेमुळे वाहतुकीत अडकलेली वाहन या दुहेरी त्रासाला नाशिककरांना सामोरे जावे लागले. संध्याकाळपर्यंत सिग्नलचा वीज पुरवठा खंडीत असल्याने दिवसभर नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागला.
--------------
यामुळे बंद पडले सिग्नल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुष्काळामुळे वीज वितरण कंपनीने ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरु केले आहे. वीजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी शहरातील सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतचा पथदीपांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. सिग्नल यंत्रणा पथदीपांच्या प्रवर्गात असल्याने वीज पुरवठ्या अभावी सिग्नल यंत्रणा बंद पडली.
-------------------
सिग्नल, पथदीप दोन प्रवर्ग
वीज वितरण कंपनीकडून या प्रकरणाची दखल घेताना पथदीप व सिग्नल यंत्रणा या दोन स्वतंत्र प्रवर्गात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वीज वितरण विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळे बुधवारपासून सिग्नल यंत्रणा सुरळीत होईल असा दावा करण्यात आला.
वीज पुरवठा बंद असल्याने सिग्नल यंत्रणा बंद पडली. महापालिकेकडून वीज वितरण कंपनीचे देयके नियमित अदा केले जतात.- अविनाश धनाईत, अधिक्षक अभियंता, विद्युत विभाग, महापालिका.
शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणा काही तास बंद होते. वीज महावितरण कंपनीकडून काही तांत्रिक कारणास्तव वीज पुरवठा खंडीत असल्याने सिग्नल बंद होते. मात्र वाहतूक पोलिस आणि ट्रॅफिक वॉर्डन हे सिग्नलवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले होते.
- माधव रेड्डी, सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा