
नाशिक : ट्रॅफिक ‘ट्रायल रन’विरोधात जनआंदोलन
नाशिक : स्मार्टसिटी (SmartCity) कंपनीकडून शहरातील विविध भागांमध्ये ट्रॅफिक ट्रायल (Traffic Trial) रन सुरू आहे. परंतु, सदर ट्रायल रन नाशिककरांसाठी त्रासदायक ठरत असल्याने प्रयोग बंद करा अन्यथा मनसे(Maharashtra Navnirman Sena) स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा बुधवारी (ता.१५) स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला.
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेईकलच्या स्थापनेनंतर त्याअंतर्गत झालेल्या महात्मा फुले कलादालन, नेहरू उद्यान, कालिदास कलामंदिर नूतनीकरण, ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम, प्रोजेक्ट गोदा सारख्या अनेक कामांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरकारभाराच्या तक्रारी आहेत. तब्बल दोन वर्षे रखडलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका स्मार्ट रोडचे काम व सद्यःस्थितीत जुन्या नाशिकमधील बाजारपेठा लगत सुरू असलेल्या कामांमुळे नागरिक, व्यावसायिक, विद्यार्थी व महिला वर्गाला अनंत अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यात आता शहरातील विविध वाहतूक बेट पुर्ननिर्माणाची भर पडत आहे.
हेही वाचा: औरंगाबाद : दहा रुपयांसाठी घेतला जीव!
सध्या पंचवटीतील परशराम पुरिया वाहतूक बेट, रविवार कारंजा येथे स्मार्टसिटी कॉर्पोरेशनतर्फे ट्रायल रन सुरू आहे. अत्यंत योजनाशून्य सुरू असलेल्या ट्रायल रनमुळे येथील नागरिक व व्यावसायिक अत्यंत धास्तावलेले आहे. ट्रायल रन विरोधात नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. सध्या शहरातील विविध भागांत सुरू असलेले ट्रॅफिक ट्रायल रन त्वरित बंद करून नागरिक, व्यावसायिक, विद्यार्थी व महिलांना दिलासा द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या विरोधात मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहर समन्वयक सचिन भोसले, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, रामदास दातीर, नितीन साळवे, विक्रम कदम, योगेश लभडे, निखिल सरपोतदार, विजय ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.