३६-४
सिग्नल बिघाडाचा नाशिकच्या चाकरमान्यांना फटका
राज्यराणी, पंचवटीला तासभर उशिर, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने
----------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिकरोड, ता.२६ : मुंबईत लोकलची ओव्हरहेड वायर तुटणे आणि सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा फटका नाशिकहून मुंबईला नोकरीनिमित्त जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना सोमवारी बसला. राज्यराणी एक्स्प्रेस सुमारे ४५ मिनिटे, तर पंचवटी एक्स्प्रेस सुमारे ५० मिनिटे उशिराने पोहोचली. त्यामुळे मुंबईत कामावर जाणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या बिघाडामुळे मुंबईत तब्बल दीडशे लोकल रद्द करण्यात आल्या. यामुळे मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत होत्या.
-----------------
मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते ठाणे आणि कांजूरमार्ग ते भांडूपदरम्यान सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशांच्या जलद आणि धिम्या मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. याचा फटका लांब पल्ल्याच्या अनेक एक्स्प्रेस गाड्यांनाही बसला. या बिघाडामुळे उपनगरीय रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला.
लोकल वाहतुकीतील तांत्रिक बिघाडाचा परिणाम लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवरही झाला. विदर्भ एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, पंजाब एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, धुळे एक्सप्रेस, हिंगोली एक्सप्रेस, हुजुरसाहेब नांदेड, वंदे भारत एक्सप्रेस, महानगरी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस तपोवन एक्स्प्रेस, हावडा- मुंबई एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस आणि इतर काही गाड्यांनाही विलंबाचा फटका बसला. प्रवाशांना रेल्वेस्थानकांवर प्रतीक्षा करावी लागली.
--------------------
कोट
गेल्या काही दिवसांपासून पंचवटी एक्स्प्रेस सकाळी नियमितपणे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. रेल्वेच्या या अनियमित वेळापत्रकाचा रोज नाशिक- मुंबई प्रवास करणाऱ्या नोकरदारांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन गाड्या वेळेत धावतील, यासाठी उपाययोजना कराव्यात.
- किरण बोरसे, उपाध्यक्ष, प्रवासी वेल्फेअर असोसिएशन.
------------------