कारसह दोन दुचाकींची चोरी
वाहन चोरट्यांचा वाढता सुळसुळाट
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २७ : शहर परिसरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. चोरट्यांनी कारसह दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी संबधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
महात्मानगर मैदानाजवळ पार्क केलेली नील जयेश पटेल (२०, रा. सावतानगर, सिडको) याची मोपेड (एमएच १५ एचडब्ल्यु १४५६) चोरीला गेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार पगार पुढील तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत राज दीपक गरुड (२६, रा. चेतना वैभव अपार्टमेंट, राणेनगर) यांनी दुचाकी (एमएच १५ एचव्ही २९८७) पार्किंगमधून रविवारी (ता. २५) मध्यरात्री चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, हवालदार पगारे तपास करत आहेत. तिसऱ्या घटनेत घरासमोर लॉक करून पार्क केलेली ४ लाख ९५ हजार रुपये किमतीची किया सेल्टॉस कार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना वृंदावन नगर परिसरात घडली. वसंत श्यामराव महाले (४७, रा. साई रो-हाउस) यांनी किया सेल्टॉस कार (एमएच ०२ एफएन ३८८४) घरासमोर पार्क केली होती. मध्यरात्री पांढऱ्या रंगाच्या क्रेटा गाडीतून आलेल्या चोरट्यांनी ही कार चोरून नेली. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.