पान तीन मेन
----------------------
(महापालिका इमारतीचे छायाचित्र वापरावे)
-------------
महापालिकेच्या सांडपाण्यापासून वीजनिर्मितीला चालना
सिन्नर थर्मल पॉवरचा प्रस्तावाला होकार, तांत्रिक व्यवहार्यता तपासणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २८ : महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील त्रिस्तरीय प्रक्रिया केलेल्या पाण्याचा औष्णिक विद्युत प्रकल्पांसाठी पुनर्वापर करण्याचा महत्वाकांक्षी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड या कंपनीने प्राथमिक स्वरूपात सकारात्मक प्रतिसाद देत होकार दर्शवला आहे. महाजेनको आणि केंद्र सरकारच्या एनटीपीसी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या या कंपनीने महापालिकेला पत्राद्वारे होकार कळविला आहे.
महापालिका हद्दीपासून ५० किलोमीटर परिघातील सर्व औष्णिक विद्युत प्रकल्पांना महापालिकेच्या प्रक्रिया केंद्रातील पाणी पुरवण्याची योजना आहे. सिन्नर थर्मल पॉवरने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. शाश्वत जल व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिकेचा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे ताज्या पाण्याच्या स्रोतांवरील अवलंबित्व कमी होईल आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा लाभदायक पुनर्वापर होईल. महापालिकेची सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आणि सिन्नर येथील औष्णिक विद्युत प्रकल्प यांचे भौगोलिक अंतर जवळचे असल्याने हा प्रस्ताव व्यवहार्य ठरू शकतो.
केंद्र व राज्य शासनाच्या जल पुनर्वापर धोरणाच्या चौकटीत राहून दोन्ही बाजूंच्या तज्ज्ञांची समिती नेमून तांत्रिक आणि व्यापारी व्यवहार्यता तपासली जाणार आहे. दरम्यान, कंपनीने पाणी खरेदी किंवा कोणताही दीर्घकालीन करार करण्याची बांधिलकी घेतलेली नाही. अटी व शर्ती पूर्ण झाल्यानंतर करार अंतिम केला जाणार आहे.
---------------
अखंड पाणीपुरवठ्याची हमी
कंपनीने महापालिकेकडे यासंदर्भात माहिती मागविली होती. त्यात प्रत्येक सांडपाणी प्रक्रिया केंद्रनिहाय किती पाणी रोज उपलब्ध होईल, हंगामी चढ-उतार आणि भविष्यातील वाढीचे नियोजन, पाण्याचे अलीकडील प्रयोगशाळा अहवाल, हमी पॅरामीटर्स आणि सतत गुणवत्ता तपासणीसाठी कोणती यंत्रणा, कोणत्या केंद्रातून पाणी घेणार, वितरणाचे ठिकाण, जलवाहिनीचा मार्ग, पंपिंग यंत्रणा, साठवणूक तलाव, मोजमाप यंत्रणा आणि इतर अनुषंगिक सुविधा, अखंड पुरवठ्याची हमी, पर्यायी व्यवस्था, नियोजित देखभाल दुरुस्तीसाठी बंदचा कालावधी आणि सेवा खंडित झाल्यास जबाबदारी कोणाची, प्रकल्पासाठी लागणारा अंदाजित भांडवली आणि परिचालन खर्च, खर्चाचे वाटप या विषयांचा समावेश होता.