मेनला क्लब
-------------
मुबलक साठा, तरीही १० टक्के पाणीकपात
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापौरांकडून संकेत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : : गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी राज्यभरातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशांचा आदर राखत १० टक्के पाणीकपात लागू करणे गरजेचे असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी स्पष्ट करतं पाणी कपातीचे संकेत दिले आहे.
महापौर म्हणाल्या, की शासन निर्देशानुसार गेल्या महासभेत पाणीकपातीवर चर्चा झाली होती. पंचवटीतील जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होताच पाणीकपातीवर विचार करण्याचा निर्णय होता. मात्र, या प्रकल्पाचे काम लांबण्याची शक्यता आणि राज्यातील दुष्काळ लक्षात घेता निर्णय घेणे आवश्यक आहे. धरणातील जलसाठा, नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची गरज आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणारे पाणी लक्षात घेऊन लवकरच शहरात १० टक्के पाणीकपात लागू केली जाईल. कुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक येणार असून त्यांची पाण्यावाचून गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे नोंदवलेली ८००५ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी योग्यच असल्याचे महापौरांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर येथील ध्वजस्तंभावरील वादावर बोलताना प्रशासन आणि साधू-महंतांमधील समन्वयामुळे नाशिकमध्ये कोणताही वाद उद्भवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत होणारी वृक्षलागवड आणि नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे पर्यावरण संवर्धनातून हवेची गुणवत्ता राखली जाईल. नाशिक हे शुद्ध, थंड हवेचे ठिकाण असल्याची जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा दावा महापौर आडके यांनी केला.
----------------