पान-१
---------------
नाशिकसाठी हवे ८२८० दशलफू पाणी!
------------
महापालिकेचा जिल्हा प्रशासनाकडे आरक्षणाचा सुधारित प्रस्ताव सादर
-----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ ः सिंहस्थ कुंभमेळा, स्थलांतरित लोकसंख्या व संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ८,२८० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे.
यात १५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीसाठी शहराच्या नियमित पाणीपुरवठ्याकरिता ७ हजार ६४५ दलघफू पाण्याची मागणी करण्यात आली आहे. जुलै- ऑगस्ट २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम आणि देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी ६३५ दलघफू अतिरिक्त पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावानुसार गंगापूर धरण समूहातून शहरासाठी ५,७१५ आणि सिंहस्थासाठी ६५ असे एकूण ५ हजार ७८० दलघफू, मुकणे धरणातून शहरासाठी १,७०० तर सिंहस्थासाठी ५७० असे एकूण २,२७० दलघफू आणि दारणा धरणातील चेहेडी बंधाऱ्यातून शहरासाठी २३० दलघफू पाणी मागण्यात आले आहे.
१६-१
कपातीतून नाशिक वगळा
अल- निनोच्या संभाव्य प्रभावामुळे ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास ग्रामीण भागातून सुमारे दहा टक्के लोकसंख्या शहरात स्थलांतरित होण्याचा अंदाज गृहीत धरून त्यासाठी २७५ दलघफू अतिरिक्त पाण्याची तरतूद मागण्यात आली आहे. राज्य शासनाने पाणी आरक्षणात दहा टक्के कपातीचे निर्देश दिले असले तरी सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व लक्षात घेता नाशिकला या कपातीमधून वगळण्यात यावे अशी मागणीही महापालिकेने केली आहे.
१६-१
नव्या वाहिनीचे काम पूर्णत्वास
शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान १ हजार ८०० मिमी व्यासाची नवीन गुरुत्ववाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून नोव्हेंबरअखेर या जलवाहिनीची चाचणी घेऊन ती कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे तसेच बारा बंगला आणि पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमतावाढही पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे.
------------------------