टूडे साठी
------------
धरण भरले तरी पाण्याची चिंता कायम
मृत पाणीसाठा उचलण्यासाठी तिसऱ्यांदा निविदा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण काठोकाठ भरले असले, तरी भविष्यातील टंचाईचा सामना करण्यासाठी चर खोदून मृतपाणी साठा उचलण्याचे नियोजन आहे. मात्र या कामासाठी काढलेल्या निविदेला दोन वेळा प्रतिसादच मिळाला नसल्याने आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईची भीती निर्माण झाली होती. जुलैमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि ऑगस्टमध्येही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणातून जायकवाडीकडे विसर्गही करण्यात आला. त्यामुळे नाशिकसह मराठवाड्याचा पाणीप्रश्नही सध्या तरी मिटला आहे. धरण भरले असले तरी भविष्यकालीन नियोजन म्हणून महापालिकेने धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव आणला आहे. गंगापूर धरण मातीचे असल्याने स्फोटकांचा वापर न करता विशेष तंत्रज्ञानाने खडक फोडून चर तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सल्लागार कंपनीने या कामासाठी ११ कोटी ६५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर केला होता. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर निविदा जारी करण्यात आल्या. पहिल्यांदा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर एकही ठेकेदार पुढे आला नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढताना धरणातील व भुयारी मार्गातील कामे करण्याची अट शिथिल करण्यात आली. तरीही दुसऱ्या निविदेलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.
-------------------