पान चार मेन
---------------
३३३०५, ३३३०६, 33308
दुष्काळाच्या झळा वन्यजीवांनाही; पाणवठ्यांना टँकरद्वारे पुरवठा
नैसर्गिक जलस्रोत आटल्याने मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रातील वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. उन्हाळ्यात नैसर्गिक जलस्रोत आटल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी जंगलाबाहेर भटकंती करावी लागते. ही परिस्थिती टाळण्यासाठी वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे तयार करणे आणि टँकरद्वारे त्यात पाणी भरणे यासारख्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
नाशिकच्या ग्रामीण भागात नैसर्गिक जलस्रोत आटल्याने वन्यजीवांना पाण्यासाठी वनक्षेत्राबाहेर भटकावे लागू नये, यासाठी टँकरद्वारे पाणवठे भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मालेगाव वनपरिक्षेत्रातील कंक्राळे येथे दोन, निंबायती येथे चार, दहिदी येथे दोन आणि पोहाणे येथे दोन कृत्रिम पाणवठे आहेत. सटाणा वनपरिक्षेत्रातही विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे उभारण्यात आले असून, टँकरद्वारे पाणी आणून हे पाणवठे भरले जात आहेत.
चांदवड आणि वडनेरभैरव परिसरातील लोढाई माता डोंगर, धोंडबाई, गोहरण, परसूल, राजदरवाडी, दिघवड, रायपूर, कानडगाव, कुंडलगाव आणि एरंडगाव परिसरात कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी भरण्यात येत आहे. ज्या ठिकाणी कृत्रिम पाणवठे नव्हते, तेथे सिमेंटची भांडी, ड्रम आणि अन्य पात्रांमधून पाण्याची सोय करण्यात आली आहे. यासह हरसूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि बाऱ्हे परिसरात १८ नवीन पाणवठे तयार करण्यात आले असून, ते सर्व सुस्थितीत आहेत.
मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका
जिल्ह्यातील डोंगराळ आणि वनक्षेत्रालगतच्या भागात पाण्याचे स्रोत आटल्यास हरीण, बिबट, ससे, मोर, कोल्हे, लांडगे तसेच अन्य वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे वळण्याची शक्यता आहे. यामुळे वन्यजीव-मानव संघर्षाचा धोका वाढू शकतो. यावर उपाय म्हणून वनक्षेत्रातील योग्य ठिकाणी पाणवठे तयार करणे, अस्तित्वातील पाणवठ्यांमधील गाळ काढणे आणि गरजेनुसार नियमित पाणी भरणे आवश्यक असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
वन्यप्राण्यांची सुरक्षितता महत्त्वाची
वनविभागाने पाणवठानिहाय नोंदी ठेवून उन्हाळ्यापूर्वीच दुरुस्ती आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. पाणवठे तयार करताना केवळ संख्या वाढविण्याऐवजी त्यांचे स्थान, पाण्याची उपलब्धता आणि वन्यप्राण्यांची सुरक्षितता यांचा विचार करणे गरजेचे आहे. पाणवठ्यांपर्यंत पोहोचताना प्राण्यांना मानवी वर्दळ, वाहने किंवा इतर धोक्यांचा सामना करावा लागू नये, याची काळजी घ्यावी लागेल. तसेच पाण्याची गुणवत्ता आणि स्वच्छतेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन वनक्षेत्रात नैसर्गिक पाणवठ्यांचे संवर्धन, कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, अशा उपाययोजनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
-यशदीप केकाण, वन्यजीव अभ्यासक