दिवाळी अंकासाठी ''डेस्टिनेशन टुरिझम''.. वाईनरी, रिसॉर्टस्‌ची पर्यटकांना भुरळ..!

दिवाळी अंकासाठी  ''डेस्टिनेशन टुरिझम''.. वाईनरी, रिसॉर्टस्‌ची पर्यटकांना भुरळ..!
Published on: 
१३ वा लेख डेस्टिनेशन टुरिझम --------------- वाईनरी, रिसॉर्ट्‌सची पर्यटकांना भुरळ! ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले नाशिक शहर आज एका वेगळ्याच आधुनिक व ग्लॅमरस रुपात जगासमोर येत आहे. एकेकाळी केवळ कुंभमेळा, प्रभू श्रीरामांचे तपोभूमी दर्शन आणि त्र्यंबकेश्वर-पंचवटीपुरते मर्यादित असणारे नाशिकचे पर्यटन आता ''आलिशान रिसॉर्ट्‌स'', ''डेस्टिनेशन वेडिंग्ज'' आणि ''वाइन टुरिझम''च्या केंद्रस्थानी पोहोचले आहे. हा बदल केवळ नाशिकपुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात वेगाने विस्तारत आहे. - मोनित ढवळे पूर्वी लग्न किंवा मोठा कौटुंबिक समारंभ म्हटला की शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगल कार्यालये, बंदिस्त हॉल किंवा उघड्या मैदानातील लॉन्स बुक केले जात असत. मात्र, गेल्या काही वर्षांत लोकांच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. विशेषतः कोविड-१९ च्‍या परिस्थितीनंतर लक्झरी हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये लग्न किंवा इतर मोठे इव्‍हेंट आयोजित करण्याकडे कल वाढलेला आहे. धावपळीच्या आणि तणावपूर्ण शहरी जीवनातून बाहेर पडून निसर्गरम्य वातावरणात दोन-तीन दिवस कुटुंबासोबत आनंद लुटण्याची संकल्पना दृढ झाली आहे. यामुळेच आज केवळ लग्नच नव्हे, तर प्री-वेडिंग शूट, रिसेप्शन, कॉर्पोरेट इव्हेंट्स, वर्धापनदिन आणि वाढदिवसांसारख्या सोहळ्यांसाठी ''रिसॉर्ट कल्चर''ला उधाण आले आहे. गंगापूर धरणाचा बॅकवॉटर परिसर, त्र्यंबकरोड, इगतपुरी आणि अंजनेरीच्या हिरवेगार डोंगररांगांमध्ये एकापेक्षा एक आलिशान आणि पंचतारांकित रिसॉर्टस उभी राहिली आहेत. शांतता, विस्तीर्ण हिरवळ, जलतरण तलाव आणि लक्झरी सेवांमुळे ही ठिकाणे परिपूर्ण ‘रेस्टिंग व सेलिब्रेशन डेस्टिनेशन’ बनली आहेत. ''सुला विनयार्ड्‌स''ची मोहिनी नाशिकच्या या आधुनिक पर्यटन क्रांतीचा पाया जर कशावर रचला गेला असेल, तर तो म्हणजे येथील ''वाइन टुरिझम''. नाशिकला भारताची ''वाइन कॅपिटल'' म्हणून जगभरात ओळख मिळवून देण्यात वायनरीजचा सिंहाचा वाटा आहे. यामध्ये अग्रक्रमाने आणि आवर्जून नाव घ्यावे लागते ते ''सुला विनयार्ड्‌स''चे. सुला विनयार्ड्‌सने केवळ दर्जेदार वाइन निर्मिती करण्यासोबत भारतात ‘वाइन टुरिझम’ ही नवी संकल्पना खऱ्या अर्थाने रुजवली. द्राक्षांच्या विस्तीर्ण बागा, विंटेज वाइन टेस्टिंग सेशन्स, आधुनिक वाइन मेकिंग प्रक्रिया जवळून पाहण्याची संधी आणि धरणाच्या विहंगम दृश्यांसमोर उभारलेले व्हिला व लक्झरी स्टे यामुळे सुला हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. केवळ स्थानिक किंवा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-विदेशातील उच्चभ्रू पर्यटक, वाइन रसिक आणि सेलिब्रिटी वर्षभर येथे हजेरी लावतात. सुलाच्या यशानंतर नाशिक जिल्ह्यात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बुटीक वायनरीज आणि रिसॉर्ट्‌स सुरू झाले, ज्यांनी नाशिकच्या पर्यटनाला उच्च दर्जाचा आयाम दिला आहे. नाशिकच्या पर्यटन कॅलेंडरमधील सर्वात मानाचा आणि जगप्रसिद्ध उत्सव म्हणजे ''सुला फेस्ट''. हा केवळ एक वाइन उत्सव नसून आंतरराष्ट्रीय दर्जाचा संगीत आणि कला महोत्सव आहे. सुला फेस्टनिमित्त देश-विदेशातील ख्यातनाम गायक, आंतरराष्ट्रीय बँड्स, डिजे आणि हजारो तरुण पर्यटक नाशिकमध्ये दाखल होतात. या महोत्सवाच्या काळात नाशिकमधील उत्साहाचे वातावरण पाहण्यासारखे असते. केवळ सुलाच नव्हे, तर नाशिक आणि इगतपुरी परिसरातील सर्व हॉटेल्स, होम स्टे आणि रिसॉर्ट्‌स महिनाभर आधीच हाऊसफुल्ल होतात. स्थानिक हस्तकला, खाद्यसंस्कृती, फॅशन आणि संगीत यांचा अनोखा मिलाफ घडवणारा हा सोहळा नाशिकला जागतिक नकाशावर एक ''ट्रेंडी युथ डेस्टिनेशन'' म्हणून प्रस्थापित करतो. यासोबतच व्हॅलोने, ग्रोव्हर झांपा, यॉर्क, डोमेन रासा यांसारख्या वाईनरीज्‌ पर्यटन वाढीमध्ये योगदान राहिले आहे. वर्षभर पर्यटकांची अविरत वर्दळ नाशिकचे हवामान वर्षभर आल्हाददायक असते. पावसाळ्यात गर्द हिरवेगार डोंगर, फेसाळणारे धबधबे आणि धुक्याची चादर यामुळे मुंबई-पुण्यातील पर्यटकांचा ओघ नाशिककडे वळतो. तर हिवाळ्यात गुलाबी थंडी, वाइन टेस्टिंग आणि शेकोटीच्या सोबतीने रिसॉर्टमधील मुक्काम पर्यटकांना भुरळ घालतो. उन्हाळ्यातही मुंबई-ठाण्यातील पर्यटक वीकेंड ब्रेकसाठी इगतपुरी व नाशिकच्या रिसॉर्ट्‌सना प्राधान्य देतात. यामुळे नाशिकमधील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात वर्षाचे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ कायम असते. स्थानिक अर्थव्यवस्थेला नवे पंख पारंपरिक मंगल कार्यालयांच्या तुलनेत रिसॉर्ट्‌समध्ये वाढलेली ही गुंतवणूक स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी उभारी देणारी ठरली आहे. यामुळे शेतकरी, स्थानिक कारागीर, केटरर्स, इव्हेंट मॅनेजर्स, ट्रॅव्हल ऑपरेटर्स आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध झाल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर, नाशिकचा प्रवास हा केवळ धार्मिक तीर्थक्षेत्राकडून एका आधुनिक, निसर्गरम्य आणि जागतिक दर्जाच्या ''रेस्टिंग व लाइफस्टाइल डेस्टिनेशन''कडे झाला आहे. आलिशान रिसॉर्ट्‌स, सुलासारख्या जागतिक दर्जाच्या वायनरीज आणि सुला फेस्टसारखे संगीत महोत्सव यांनी नाशिकच्या पर्यटनाला एक नवा, डौलदार साज चढवला आहे. पारंपरिक चौकटी मोडून स्वतःला घडवणाऱ्या नाशिकची ही झेप पर्यटनाच्या क्षेत्रात नक्कीच दिशादर्शक ठरत आहे. (लेखक सुला विनयार्ड्‌सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com