पूर्ववैमनस्यातून
प्राणघातक हल्ला
नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून तरुणावर धारदार शस्त्राने जिवे मारण्याच्या उद्देशाने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना जेल रोड परिसरात घडली. वैभव भाऊसाहेब बोराडे (३२, रा. द्वारकानगर, नाशिकरोड) हे मित्रासोबत गप्पा मारत असताना, संशयित निखिल संजय बोराडे (२७, रा. भगवती लॉन्सजवळ) याने तिथे येऊन पूर्ववैमनस्यातून वाद घातला. संशयित निखिल याने धारदार शस्त्र काढून वैभव यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि बरगडीजवळ वार करून गंभीर जखमी केले. नाशिक रोड पोलिसांनी संशयितास अटक केली असून, उपनिरीक्षक बिडकर तपास करत आहेत.
--
जावयाला झोडपले
नाशिक : मुलाला भेटण्यासाठी पत्नीच्या माहेरी गेलेल्या पतीला सासू, सासरे व मेहुण्याने लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली, तसेच त्याची दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार जेतवननगर येथे घडला. फिर्यादी जेतवननगर येथील सासुरवाडीला मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथे सासू, सासरे आणि मेहुणा यांनी वाद घालत त्यांना मारहाण केली आणि त्यांची दुचाकी पेटवून दिली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार झाडे तपास करत आहेत.
--
महिला वकिलाची
पर्स हिसकावली
नाशिक : दुचाकीवरून जाणाऱ्या महिला वकिलाच्या हातातील पर्स आणि मोबाईल दुचाकीस्वाराने हिसकावून नेल्याची घटना टाकळी रोडवर मुक्ताई हॉस्पिटलजवळ घडली. ॲड. दीपाली श्यामराव कुलथे (३९, रा. जेल रोड) या आपल्या दाजींसोबत दुचाकीने जात असताना, पाठीमागून आलेल्या मोपेडस्वाराने त्यांच्या हातातील पर्स हिसकावली. पर्समध्ये मोटोरोला कंपनीचा मोबाईल, ॲक्टिव्हा व कोर्ट लॉकरची चावी, घरची चावी असा सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी उपनगर ठाण्यात गुन्हा दाखल असून, हवालदार पवार तपास करत आहेत.
---
दोन डॉक्टरांविरुद्ध
विनयभंगाचा गुन्हा
नाशिक : नोकरीचे ठिकाण सोडताना थांबवून हात धरून ओढल्याप्रकरणी आणि स्त्री मनाविरुद्ध वर्तन केल्याप्रकरणी नाशिक रोड परिसरातील दोन डॉक्टरांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला रिसेप्शनिस्टचे काम आटोपून एनडीएमव्हीपी शाळेसमोर पार्क केलेली दुचाकी घेण्यासाठी गेली असता, संशयित डॉ. आनंद भुजबळ (रा. नाशिक रोड), डॉ. गुप्ता (रा. पळसे) याने गैरवर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, महिला सहायक निरीक्षक क्षितिजा ठुबे पुढील तपास करत आहेत.
--
गोवंश जनावरांची सुटका
नाशिक : कसाईवाडा, कुरेशीनगर, वडाळा नाका परिसरात अवैध कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली ९७ हजार रुपये किमतीची चार गोवंश जनावरे पोलिसांनी जप्त केली आहेत. अंमलदार जयेश अंबिकार यांच्या फिर्यादीनुसार, संशयित अमन अफजल कुरेशी व नासीर बबलू कुरेशी उर्फ नासीर कय्यूम शेख यांनी ४ जनावरे बेकायदेशीर कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे आढळले. भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.