
Nashik Sports Update : BCCIच्या NCA कॅम्पसाठी नाशिकच्या प्रतीक तिवारीची निवड
नाशिक : नाशिकचा डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारी याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयतर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी - एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली आहे.
२४ एप्रिल ते १८ मेदरम्यान माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए, बेंगळुरूतर्फे भारतभरातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी हे शिबिर होणार आहे. (Nashiks Pratik Tiwari selected for BCCIs NCA camp Nashik Sports Update news)
प्रतीकने १९ वर्षांखालील नाशिक जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करताना मागील हंगामात एप्रिल- मे २०२२ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा आपल्या अचूक व भेदक गोलंदाजीने गाजविली.
प्रतीकने या स्पर्धेत ५ सामन्यात तब्बल ४१ बळी मिळविले. त्याच्या जोरावर पाच साखळी सामन्यात ४ विजय मिळवत, नाशिक जिल्हा संघाने अ गट विजेतेपद पटकाविले होते. स्थानिक क्रिकेटमध्येही १९ वर्षांखालील तसेच खुल्या गटात देखील प्रतीकच्या प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन होत असते.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
अंतिम संघ निवडीसाठी पुणे येथे झालेल्या संभाव्य संघातील सामन्यात देखील प्रतीकने आपल्या गोलंदाजीने छाप पाडली. वेळोवेळी केलेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट (इन्व्हिटेशन लीग) स्पर्धेत केलेल्या अशा लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच यंदा प्रतीक प्रभात तिवारीची १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाली.
प्रतीकच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकचे अभिनंदन केले आहे.