वणी- आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर असलेल्या विविध धार्मिक स्थळांपैकी एक व पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या शीतकड्यावरुन वर्षभरात पाच ते सात जण ४६०० फूट दरीत स्वत:ला झोकून देत देहत्याग करतात. सातत्याने घडणाऱ्या या आत्महत्येच्या घटनांमुळे ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या शीतकड्याची ओळख आता ‘आत्महत्येचे ठिकाण’ म्हणून कुप्रसिद्ध होऊ पाहत आहे. सदरचा भाग वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वनविभागाने अशा घटनांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.