टुडे २ मेन फिचर
---
NSK26H33913
नशिराबाद : अतिक्रमण निर्मूलन कारवाईदरम्यान दुकानदारांना समजवताना अध्यक्ष नगरसेवक कीर्तीकांत चौबे व पोलिस.
----
NSK26H33918
मोहिमेदरम्यान कारवाईला विरोध करताना दुकानदारांसह जमलेले नागरिक.
----
नशिराबादला अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तणाव
दुकानदारांचा विरोध; बाचाबाचीत एक जखमी, अध्यक्षांना सुरक्षितस्थळी हलविले, कारवाई स्थगित
सकाल वृत्तसेवा
नशिराबाद (ता. जळगाव), ता. २९ : शहरातील बसस्थानक परिसरात गुरुवारी (ता. २९) नशिराबाद नगरपरिषदेतर्फे ‘सुंदर शहर स्वच्छ शहर’ या अंतर्गत राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला दुकानदारांच्या विरोधामुळे तणावपूर्ण वळण लागले. कारवाईदरम्यान नगरपरिषदेचे अधिकारी पथक आणि दुकानदारांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर गोंधळात झाले. या घटनेत एका दुकानदाराच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने ही मोहीम तात्पुरती स्थगित केली.
नगरपरिषदेचे पथक बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी दाखल झाल्यानंतर काही दुकानदारांनी कारवाईला विरोध केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद आणि बाचाबाची झाली. वाद वाढत गेल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान एका दुकानदाराच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समजते. घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला.
अध्यक्ष सुरक्षितस्थळी
वादादरम्यान अतिक्रमण निर्मूलन समितीचे अध्यक्ष नगरसेवक कीर्तीकांत चौबे यांच्याविरोधात जमाव आक्रमक झाल्याचे समोर आले. संतप्त जमावाने त्यांच्या दिशेने धाव घेत शिवीगाळ केली व धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही रोषाचा सामना करावा लागला. कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच नशिराबाद पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे, चंद्रकांत पाटील आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी चौबे यांना सुरक्षितस्थळी हलवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
पोलिस बंदोबस्तात वाढ
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, निर्माण झालेला तणाव आणि संभाव्य अनुचित प्रकार लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती थांबविली. ही कारवाई पुन्हा कधी सुरू होणार, तसेच नोटिसांबाबत उपस्थित झालेल्या आक्षेपांवर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
चौकट
नोटिसा मिळाल्या नसल्याचा दुकानदारांचा दावा
अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान नोटिसा बजावण्याच्या प्रक्रियेवरूनही वाद निर्माण झाला. काही दुकानदारांना नोटिसा मिळाल्या, तर काहींना नोटिसा मिळाल्याच नसल्याचा दावा संबंधित दुकानदारांनी केला. दुसरीकडे, अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतरच कारवाई सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोट
नशिराबाद शहराच्या विकासासाठी व सुंदर व स्वच्छ शहर निर्माण करण्यासाठी पुढेही अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवली जाईल. या ठिकाणी कोणताही भेदभाव केला जात नाही. कोणाचेही अतिक्रमण असेल तर ते काढले जाईल.
- कीर्तीकांत चौबे, सभापती,
अध्यक्ष, अतिक्रमण निर्मूलन समिती