NSK26H31501
जळगाव : रोटरी क्लब जळगावतर्फे आयोजित नेशन बिल्डर ॲवॉर्ड वितरण सोहळ्यात सन्मानित शिक्षकांसोबत प्रा. शरदचंद्र छापेकर, सुरेश केसवानी, ॲड. हेमंत भंगाळे, स्वाती ढाके व मान्यवर.
योग्य मार्गदर्शक होण्यासाठी समृद्ध होणे गरजेचे
प्रा. छापेकर : ‘रोटरी’तर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर ॲवॉर्डने सन्मान"
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : विद्यार्थ्यांना घडविताना शिक्षकांनी योग्य मार्गदर्शकाची भूमिका बजावण्यासाठी स्वतःचे ज्ञान व अनुभव समृद्ध करणे गरजेचे आहे. शिक्षक हा सतत शिकणारा विद्यार्थी असून त्याने निरंतर अध्ययन व साधना केली पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त उपप्राचार्य प्रा. शरदचंद्र छापेकर यांनी केले.
गणपतीनगरातील रोटरी हॉलमध्ये रोटरी क्लबच्या वतीने आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी रोटरी डिस्ट्रिक्ट नेशन बिल्डर ॲवॉर्ड समितीचे सदस्य सुरेश केसवानी, अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके उपस्थित होते. "
कार्यक्रमात ग्रामीण भागातील शिक्षक प्रशांत देसले (ममुराबाद), शरद पाटील (ममुराबाद), वासुदेव महाजन (धानोरा), राहुल जाधव (उपखेडा, ता. चाळीसगाव), मंगला नारखेडे (असोदा) आणि अर्चना मोरे (देवळी, ता. चाळीसगाव) यांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
शिक्षकांच्या वतीने वासुदेव महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व सन्मानित शिक्षकांचा कार्यपरिचय लिटरसी कमिटीच्या चेअरमन विनया जोशी यांनी करून दिला. वक्त्यांचा परिचय सुधीर पाटील यांनी करून दिला. सुभाष अमळनेरकर यांनी आभार मानले.
चौकट
‘शिक्षकांनी तंत्रस्नेही व्हावे’
प्रा. छापेकर म्हणाले, की विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी बळ देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. दैनंदिन कामकाज सांभाळतानाच शिक्षकांनी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. बदलत्या काळात शिक्षकांसमोर अनेक आव्हाने आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)सारखे तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात येत असल्याने शिक्षकांनीही तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे.