पीक कर्ज वितरणात
राष्ट्रीयीकृत बँका मागे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : खानदेशात खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरण सुरू आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका पीक कर्ज वितरणाबाबत हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकांनी मात्र पीक कर्ज वितरणाला गती दिली आहे. धुळे-नंदुरबार जिल्हा बँक आणि जळगाव जिल्हा बँकेने खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरणाचे लक्ष्य निश्चित झाल्यानंतर प्रस्ताव वेगाने स्वीकारून कर्ज वितरण सुरू केले. जळगाव जिल्हा बँकेला यंदा सप्टेंबर २०२६ पर्यंत सुमारे एक हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करायचे होते. धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेला सुमारे २४१ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. या दोन्ही बँकांनी लक्ष्यांकातील जवळपास १०० टक्के पीक कर्ज वितरण पूर्ण केले आहे. मे महिन्यातच या बँकांनी ७५ ते ८० टक्के पीक कर्जाचे वितरण केले होते. जळगाव जिल्हा बँकेने मागील वर्षीही पीक कर्ज वितरणात आघाडी घेतली होती.
खानदेशात राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वितरण संथ गतीने केले आहे. मागील रब्बी हंगामातही केवळ ७५ टक्के पीक कर्ज वितरण झाले होते. गेल्या खरीप हंगामातही कर्ज वितरणाची गती संथ राहिली. प्रशासनाने निश्चित केलेल्या लक्ष्यांकाएवढे पीक कर्ज वितरण झालेले नाही, अशी स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण २, ९०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरण अपेक्षित होते. तर धुळे-नंदुरबार जिल्ह्यांत मिळून सुमारे १, ५०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरण अपेक्षित होते. नंदुरबारात स्टेट बँक ऑफ इंडिया अग्रणी बँक आहे, तर जळगावात सेंट्रल बँक ऑफ इंडिया अग्रणी बँक आहे. या दोन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून राष्ट्रीयीकृत बँका तसेच अन्य बँकांना पीक कर्ज वितरणाबाबत सातत्याने आवाहन करण्यात आले.